पान:शिल्पकार चरित्रकोश खंड २ – साहित्य.pdf/१६८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
साहित्य खंड
आपटे, नारायण हरी
 
नारायण हरी आपटे ह्यांची स्वाक्षरी.

संपादनात साहाय्य केले. कोरेगावला स्वतःचा छापखाना काढून काही काळ 'मधुकर' नावाचे मासिक आणि 'आल्हाद' नावाचे साप्ताहिक त्यांनी चालविले. स्वतःचे प्रकाशनही काढले. पण भांडवलाअभावी हा व्यवसाय बंद करावा लागला. कादंबरी लेखन आणि कथा लेखन हे ब्रीद मात्र त्यांनी राखले. सामाजिक, ऐतिहासिक, अद्भुतरम्य अशा वैविध्यपूर्ण विषयांवरच्या व वेगवेगळ्या तंत्रशैलीच्या सुमारे पंचेचाळीस कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. 'कपटजाल' (१९१३), 'पिशाच्च साधने अथवा असुरी संपत्तीचा प्रभाव' (१९२०), 'रत्नगुंफा' (१९३३), 'अजरामर' (१९४६), या त्यांच्या कादंबऱ्यांतील अद्भुताची नवीन सृष्टी पाहून वाचक लुब्ध झाले. 'लांछित चंद्रमा' (१९१३), 'राजपुतांचा भीष्म' (१९१९), 'संधिकाल' (१९२२), या राजपुतांच्या इतिहासावर आधारलेल्या वीर पुरुषांच्या कादंबऱ्यांमधून त्यांनी स्वदेशाभिमानाला जागविले.
 आपल्या सामाजिक कादंबऱ्यांमधून मध्यमवर्गीयांच्या जीवनचित्रणाला हात घातला. सासू-सुनांचा कलह रेखाटणारी 'वंदावे की निंदावे' (१९१३), विलायतेत शिक्षण घेणाऱ्या तरुण पिढीच्या वृत्ति - प्रवृत्तींचे दर्शन घडविणारी 'दुरंगी दुनियेत' (१९२२), फसवून वृद्धाशी विवाह झाल्यामुळे तरुणीच्या वाट्याला आलेल्या भेसूर जीवनाचे करुण चित्रण करणारी 'न पटणारी गोष्ट' (१९२३)- या कादंबरीवर आधारित 'प्रभात'चा 'कुंकू' चित्रपट त्या काळात अतिशय गाजला- शिक्षणाने व संस्कारांनी सुजाण बनलेल्या तरुणाच्या हळुवार मनाचा वेध घेणारी 'पहाटेपूर्वीचा काळोख' (१९२६), या त्यांच्या कादंबऱ्या मनाचा ठाव घेणाऱ्या आहेत. 'उमज पडेल तर' (१९३४), 'अपेक्षा' (१९४९), या कादंबऱ्या संसाराचा आदर्श कसा निर्माण करावा, हा संदेश देतात तर 'जाऊबाई' (१९५०) ही कादंबरी एकत्र कुटुंबातील थोरल्या जावेचे मनोज्ञ दर्शन घडविते. 'कोणी कोणाचे नव्हे' (१९५९) या कादंबरीतून आपटे यांनी जी तडफदार तरुणी शब्दबद्ध केली आहे, तिला तोड नाही. 'त्या अबला होत्या' (१९२८), 'संगदोष' (१९४३) या सामाजिक समस्यांचा ऊहापोह करणाऱ्या कादंबऱ्या त्यांच्या समाजचिंतनाची साक्ष देतात. 'आम्ही दोघे' या त्यांच्या कादंबरीत कथानकाची प्रमाणबद्धता, सुंदर भाषाशैली, उपमांमधून व प्रतिमांमधून व्यक्त होणारी सहजता व दोघांच्या आंतरिक संघर्षाचे प्रत्ययकारी चित्रण यांचा समन्वय झाल्याने, त्यांच्यातल्या अस्सल कलावंताचे दर्शन घडते. असे त्यांचे कादंबरी लेखन विपुल, वैविध्यपूर्ण व तंत्रकुशल आहे. चार-दोन रेषांच्या फटकाऱ्यांनी स्वभावचित्र रेखाटणे, वाचकांना आत्मीयता वाटेल अशा पद्धतीने जीवन चित्रण करणे, बोधवादी दृष्टी ठेवूनही कथानकाचा सांधा बिघडू न देणे, सहज व ओघवती भाषाशैली व परिणामकारक निवेदन करण्याची हातोटी, मध्यमवर्गाच्या ज्ञात-अज्ञात कंगोऱ्यांना आत्मीयतेने उलगडण्याची क्षमता व त्याला उभारी देण्याची वृत्ती, या सर्व गुणांनी त्यांची कादंबरी लक्ष वेधून घेते. त्यांचे कथालेखनही मध्यमवर्गीयांच्या जिव्हाळ्याने ओतप्रोत भरलेले आहे. कथालेखक हा वाचकाचा सन्मित्र असावा, ही त्यांची भूमिका असल्याने त्यांच्या कथांवर बोधवादाची दाट छाया पडलेली आहे. पण मध्यमवर्गीय जीवनाच्या विविध छटा आपल्या कथांमधून रंगवून सांगण्याच्या त्यांच्या प्रवृत्तीमुळे व वास्तवावर आधारित जीवन चित्रणामुळे त्यांच्या कथाही परिणामकारक झालेल्या आहेत. 'बनारसी बोरे', 'आराम-विराम', 'हसा किंवा रुसा', 'कोंडकणी' हे त्यांचे कथासंग्रह लोकप्रिय आहेत. 'नाव नसलेली गोष्ट', 'तान्हेली कैदी', 'सुमती', 'कल्पनेची भरारी' यांसारख्या कथा त्यांच्या शैलीचे आगळे दर्शन घडवितात. प्रदीर्घ काळ कादंबरी लेखन करणारे व बोधवादाची पालखी

शिल्पकार चरित्रकोश
२३