पान:शिल्पकार चरित्रकोश खंड २ – साहित्य.pdf/१६९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अ- औ

आपटे, वामन शिवराम
साहित्य खंड
 

खांद्यावर घेऊनही, लोकप्रियतेचा ध्वज कायम फडकवीत ठेवणारे यशस्वी कादंबरीकार, कथाकार म्हणून आपटे यांचे कायम स्मरण राहील.

- डॉ. संजय देशमुख

संदर्भ:

  1. देशपांडे कुसुमावती; 'मराठी कादंबरी पहिले शतक' १८५०-१९५०; मुंबई मराठी साहित्य संघ प्रकाशन.
  2. मराठी वाङ्मयाचा इतिहास, खंड ५, भाग १: महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे.
  3. कुरुंदकर नरहर, 'धार आणि काठ; देशमुख आणि कंपनी, पुणे.


आपटे, वामन शिवराम
कथाकार, लघुनिबंधकार, अनुवादक
२ जुलै १९९६ - २५ मे १९९८

 कल्याण येथे वास्तव्य केलेल्या वामनरावांनी एम. ए., बी. टी. पर्यंत शिक्षण घेऊन उल्हासनगर (जि. ठाणे) येथील तलरेजा महाविद्यालयात मराठी विषयाचे अध्यापन केले. किशोर व युवक ह्यांच्यासाठी प्रा. आपटे यांनी कथा व लघुनिबंधवजा अनेक संस्कारक्षम पुस्तके प्रकाशित केली. 'मित्र कसे जोडावेत' (१९७४) हे सांगून त्यांनी 'सदैव जायचे पुढे' अशी प्रेरणा देताना 'ध्येय कसे गाठाल?' (१९७६) याचे उत्तम मार्गदर्शन केले. आपटे म्हणतात, "व्यवसाय हे जीवनाचे एक साधन आहे. साध्य किंवा ध्येय निराळे असते. ध्येय म्हणजे ज्याचा नेहमी ध्यास घ्यायचा, ज्याचे नेहमी चिंतन करावयाचे ते. ध्येयाचे अनुकरण, आचरण समाजातच व्हायचे आहे. समाजाला सोडून जीवनच नाही." जे-जे चांगले मनात येते, ते-ते सर्वांना सांगणे; हे आपटे यांचे 'ध्येय' होते. हिंदीतील व इंग्रजीतील काही लोकप्रिय पुस्तकांचे अनुवादही त्यांनी केले. सहा ते साठ वर्षांच्या सर्व व्यक्तींना त्यांचे जीवित कार्य अधिक क्षमतेने पार पाडता यायला मदत होईल अशा विश्वासाने त्यांनी 'स्मरणशक्ती कशी वाढवावी' याचा व्यावहारिक मंत्र दिला. आपटे यांनी 'चिंता का करता?' असा प्रश्न विचारून चिंतेचे मानसशास्त्र व शास्त्रज्ञांनी तत्संबंधी केलेले विश्लेषण सांगून चिंतानिवारणाचे उपाय सुचविले. आपटे यांची ही पुस्तके वाचकांना आवडली.
 अकरा वर्षांच्या अखंड मेहनतीने शेक्सपिअरच्या ३७ पैकी ३४ नाटकांचे सुरस, सुबोध व नेटके भाषांतर करून वामनरावांनी मराठी भाषेची मोठी सेवा केली. 'शेक्सपिअर जसा आहे तसा' सादर करण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला. विविध पात्रांची भाषा ही नेहमीची व्यवहारात असलेली भाषा असून आपटे यांनी नाटकातल्या पद्याचा अनुवाद गद्यच ठेवला आहे. या ग्रंथाची अभ्यासपूर्ण प्रदीर्घ प्रस्तावनादेखील त्यांच्या कार्याचे उल्लेखनीय वैशिष्ट्य आहे.

- वि. ग. जोशी

संदर्भ:

  1. खानोलकर गं. दे.; 'मराठी वाङ्मयसेवक चरित्रकोश, खंड १, अथेना पब्लिशर्स, मुंबई, २००३.

आपटे, वासुदेव गोविंद
निबंधकार, कोशकार, अनुवादक, बालवाङ्मयकार
१२ एप्रिल १८७१ - २ फेब्रुवारी १९३०

 बालवाङ्मयाचे बालमासिकाचे निबंधकार, लेखक, संपादक, कोशकार, टीकाकार, अनुवादक म्हणून ख्याती असलेल्या वा. गो. आपटे यांचा जन्म धरणगाव; जिल्हा जळगाव येथे झाला. त्यांचे माध्यमिक शिक्षण धुळे येथे तर उच्चशिक्षण इंदूर व नागपूर येथे झाले. इ. स. १८९३ मध्ये त्यांनी कोलकाता विद्यापीठाची बी. ए. पदवी संपादन केली. त्यानंतर पुणे येथून नूतन मराठी विद्यालयात ते शिक्षक म्हणून रुजू झाले.


२४
शिल्पकार चरित्रकोश