पान:शिल्पकार चरित्रकोश खंड २ – साहित्य.pdf/१७०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अ- औ

साहित्य खंड
आपटे, वासुदेव गोविंद
 

 कोलकाता विद्यापीठातून पदवी घेत असताना त्यांचा संबंध बंगाली भाषेशी आला, भाषाभ्यासाची आवड असल्याने बंगाली भाषा शिकून त्यावर प्रभुत्व मिळविले. त्याशिवाय हिंदी, गुजराती, कानडी, तेलगू, तमीळ इत्यादी प्रादेशिक भाषाही त्यांना अवगत होत्या. उर्दू, फ्रेंच, पाली इत्यादी अन्य भाषांचाही त्यांनी अभ्यास केला. मराठी तर त्यांची मातृभाषा, त्यामुळे या सर्व भाषाभ्यासाचा उपयोग त्यांना त्यांच्या लेखनात, अध्ययनात व अध्यापनात झाला. चरितार्थव्यवसाय निमित्ताने त्यांची मुंबई, इंदूर, अलाहाबाद, पुणे पुन्हा इंदूर अशी भ्रमंती चालू होती. इंदूरच्या राणीसाहेबांच्या आमंत्रणावरून राजकन्यांचे शिक्षक म्हणून त्यांनी काही वर्षे अलाहाबाद येथे वास्तव्य केले. तेथे त्यांचा 'मॉडर्न रिव्ह्यू'चे संपादक रामानंद चटोपाध्याय यांच्याशी परिचय झाला आणि त्यांचा सांगण्यावरून वा. गो. आपटे यांनी त्यांच्या 'मॉडर्न रिव्ह्यू' पत्रात मराठी पुस्तकांवर परीक्षणे लिहिली.
 बंगाली भाषेचा आणि बंगाली ग्रंथांचा अभ्यास असल्याने बंकिमचंद्र चटर्जी यांच्या ऐतिहासिक, अद्भुतरम्य, सामाजिक कादंबऱ्यांचे अनुवाद त्यांनी केले 'भारत गौरव ग्रंथमाले' तर्फे चार खंडांत (१९२३ ते १९२५) हे अनुवाद प्रसिद्ध झाले. बंकिमचंद्र चटर्जी यांच्या 'इंदिरा', 'दुर्गेशनंदिनी', 'कपालकुंडला', 'मृणालिनी', 'आनंदमठ' 'देवी चौधुराणी', 'कृष्णकांतांचे मृत्युपत्र' इत्यादी चौदा कादंबऱ्यांचा त्यात समावेश आहे. आंतरभारतीच्या आणि मराठी भाषेच्या दृष्टीने आपटे यांचे कार्य अत्यंत मोलाचे आहे.
 'वाल्मीकीचा जय' ही कादंबरी बंगालीतून मराठीत अनुवादित केली. 'श्री. हरनाथ ठाकूर यांची अपूर्व पत्रावली' खंड- १ (१९२४) व खंड २ (१९२५) हेही त्यांनी अनुवादित केले.
 सामाजिक सुधारणांच्या इष्टानिष्टते विषयीच्या चर्चांना भरपूर वाव देणारी ऐतिहासिक कलाकृती 'मूर्तिमंत देशाभिमान' त्यांनी १९०७ मध्ये प्रकाशित केली. 'नवयुग' ही स्वतंत्र सामाजिक कादंबरी (१९०३) लिहिली. काही सामाजिक लघुकथांचे त्यांनी लेखन केले. त्यात 'त्रिवेणी' कथा 'अवगुंठिता' या बंगाली कथेवरून तर 'मोतीमिनार' कथा अकबरकालीन गोष्टीवर आधारित होती. वा. गो. आपटे यांनी त्यांना आवडलेल्या इंग्रजी कादंबऱ्यांचा मराठीत अनुवाद केला. त्यात मिसेस हेन्रीवूडच्या 'इस्टलीन' कादंबरीचे 'माणिकबाग' (१९१४), तसेच 'मिसेस हॅल्बिर्टसन्स ट्रबल्स' या कादंबरीचा 'दुःखा अंती सुख' (१९१४) या अनुवादित कादंबऱ्यांचा समावेश आहे. त्यांच्या सरस भाषांतरांतून मराठी वाङ्मय वाचकांची दृष्टी अधिकाधिक व्यापक होण्यास मदत झाली. वा. गो. आपटे यांनी भाषांतरित, रूपांतरित कादंबऱ्यांच्या प्रवाहाला चालना देण्याचे महत्त्वाचे काम केले.
'मराठी शब्दरत्नाकर'कार
 भाषाभ्यासाची विविध अंगे लक्षात घेऊन कोशसदृश पुस्तकांचे लेखनही त्यांनी केले. 'बंगाली - मराठी कोश' आणि 'मराठी - बंगाली शिक्षक' हे ग्रंथ लिहिले. 'मराठी भाषेचे संप्रदाय व म्हणी' (१९१०) हा महत्त्वाचा ग्रंथ त्यांनी लिहिला. त्यात सुमारे चार हजार वाक्संप्रदाय आहेत. 'संप्रदाय व त्यांची व्याप्ती' पहिल्या प्रकरणात सांगून पुढे संप्रदायांचे वर्गीकरण केले आहे. पुस्तकाची २०८ पाने वाक्संप्रदायांनी व्यापली आहेत. पुढे ५८ पाने म्हणींची व्याख्या व पद्धतशीर वर्गीकरण केले आहे. 'म्हणी' ही दिल्या आहेत. आजही हा कोश अभ्यासकांना उपयोगी पडत आहे. पाच ते सात वर्षे सातत्याने परिश्रम घेऊन तयार केलेला 'मराठी शब्दरत्नाकर' अथवा 'मराठी शब्दांचा मराठीत अर्थ देणारा कोश, १९२२ मध्ये प्रकाशित झाला. हा कोश लिहिताना त्यांना पोथ्या, कागदपत्रे इत्यादी ऐतिहासिक ऐवज पाहावयास मिळाला. त्यांचा अभ्यास करताना त्यात काही अपपाठ व चुकीचे अर्थ त्यांना आढळले. त्यांची दुरुस्ती करून ते शब्द त्यांनी या कोशात समाविष्ट केले आहेत.
 कोशवाङ्मयाच्या प्रारंभीच्या पर्वातील एक अत्यंत महत्त्वाचा कोश म्हणून या कोशाचे मराठी वाङ्मयात स्थान आहे. 'मराठी भाषेची शब्दसंपत्ती' (१९२२), 'लेखनकला व लेखनव्यवसाय' (१९२५), 'सौंदर्य व


शिल्पकार चरित्रकोश
२५