पान:शिल्पकार चरित्रकोश खंड २ – साहित्य.pdf/१७१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अ- औ

आपटे, हरी नारायण
साहित्य खंड
 

ललितकला' (१९१९) याशिवाय वा. गो. आपटे यांनी 'अशोक अथवा आर्यावर्ताचा पहिला चक्रवर्ति राजा' याचे चरित्र (१८९९) अशी त्यांची ग्रंथसंपदा आहे. त्यांचा 'अशोक' हा ग्रंथ विष्णू गो. विजापूरकर यांच्या 'ग्रंथमाला' या मासिकातून प्रसिद्ध झाला होता. 'जैनधर्म' (१९०४) आणि 'बौद्धपर्व' अथवा 'बौद्धधर्माचा साद्यंत इतिहास' (१९१४) हे ग्रंथ लिहिले. 'ज्ञानदीप', 'भारतकन्या' ही पुस्तकेही लिहिली. एकूण चोवीसच्यावर ग्रंथ त्यांनी लिहिले.
 वा. गो. आपटे यांची मराठी वाङ्मयाविषयीची आवड निर्माण होण्यास त्यांची बुद्धिमत्ता कारणीभूत होती, त्याचप्रमाणे त्यांना त्यांच्या उमेदीच्या काळात लेखक मोती बुलासा आणि प्राचार्य. वा. ब. पटवर्धन यांची मैत्री लाभली. तसेच कादंबरीकार हरिभाऊ आपटे यांचा सहवास लाभला होता. हरिभाऊ हे त्यांचे स्फूर्तिदाते व मार्गदर्शक होते.
'आनंद' मासिकाचे उद्गाते
 त्यांनी १९१० मध्ये चंद्रावती महिला विद्यालय, इंदूर येथे नोकरी केली. या काळात इंदूर काळात इंदूर सरकारने 'मल्हारीमार्तंड' ह्या पत्राचे संपादकत्व त्यांना दिले. पाच वर्षे त्यांनी ते काम केले. याशिवाय 'ज्ञानप्रकाश' चे संपादकपद तसेच 'विचारसाधना'चे संपादकपदही काही काळ संभाळले. संपादक, कोशकार, अनुवादक, लेखक असा साहित्याच्या सर्वांगाला स्पर्श करत असताना त्यांच्या बालवाङ्मयविषयक कार्यामुळे ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचले. बालसाहित्यासाठीचे त्यांचे योगदान लक्षणीय आहे. १९०६ मध्ये वा. गो. आपटे यांनी 'आनंद' हे मासिक मुलांकरिता सुरू केले. ते आजही नियमितपणे चालू आहे. या मासिकाचे विशेष म्हणजे यात मुलांचे लेखन छापले जाई. चुटके, कोडी, कविता, गमतीजमती, मजेदार गोष्टी असा रंजक व प्रबोधनपर मजकूर यात असल्यामुळे हे मासिक बालवाचकांना प्रिय झाले. १९२५ पासून या मासिकात 'प्रौढ विद्यार्थी व स्त्रिया' यांच्यासाठी सुरू केलेल्या पुरवणीत देशातील सामाजिक, राजकीय, धार्मिक घडामोडींच्या दोनही बाजू वाचकांना कळाव्यात व पक्षाभिमान किंवा दुराग्रह याला बळी न पडता त्या विषयांची सर्वांगीण माहिती त्यांना व्हावी, असा त्यांचा उद्देश होता. त्याला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला. 'आनंद' मासिकाव्यतिरिक्त इतर बालवाङ्मय त्यांनी लिहिले. 'मनी आणि मोत्या', 'वीरांच्या कथा', 'एका दिवसाच्या सुट्टीत', 'मुलांचे अरेबिअन नाइट्स' इत्यादी कथात्मक पुस्तके तसेच 'बालरामायण', 'बालमहाभारत', ' का व कसे?' इत्यादी उद्बोधक अशी एकूण ५३ पुस्तके त्यांनी मुलांसाठी लिहिली.
 महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या घटनेचा पहिला मसुदा वा. गो. आपटे यांनी लिहिला. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या आद्य चिटणिसांपैकी ते एक होते. त्यांनी दहा वर्षे चिटणीसपद भूषविले.

- डॉ. रजनी अपसिंगेकर

संदर्भ:

  1. डॉ. देशपांडे अ. ना.; 'आधुनिक मराठी वाङ्मयाचा इतिहास' १८७४ ते १९२० भाग १; व्हीनस प्रकाशन, पुणे.
  2. खानोलकर गं. दे.; 'अर्वाचीन मराठी वाङ्मयसेवक' खंड १; स्वस्तिक पब्लिशिंग हाउस, मुंबई.
  3. जोग रा. श्री.; 'मराठी वाङ्मयाचा इतिहास' १८७५ ते १९२० खंड ५- भाग-१, २; महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ.
  4. कानडे रा. गो.; 'मराठी नियतकालिकांचा इतिहास' १८३२ ते १९३७; कर्नाटक पब्लिशिंग हाउस, मुंबई.


आपटे, हरी नारायण,
कथाकार, कादंबरीकार, विदग्ध वाङ्मयकार, कुशल संपादक
८ मार्च १८६४ - ३ मार्च १९१९

 हरि नारायण आपटे यांचा जन्म जळगाव जिल्ह्यातील पारोळे येथे झाला. वडील नारायणराव मुंबईला पोस्टात नोकरी करीत होते. हरिभाऊंचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मुंबईतील नाना शंकरशेटची शाळा व बिशप हायस्कूलमध्ये झाले. १८७८ साली ७० कुटुंबाचे स्थलांतर पुणे येथे झाल्यामुळे हरिभाऊंचे पुढील शिक्षण पुण्याच्या सरकारी हायस्कुलात झाले. माध्यमिक शिक्षण


२६
शिल्पकार चरित्रकोश