पान:शिल्पकार चरित्रकोश खंड २ – साहित्य.pdf/१७२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अ- औ

साहित्य खंड
आपटे, हरी नारायण
 

घेताना एका संस्कृत शास्त्र्यांच्या खासगी मार्गदर्शनाखाली हरिभाऊंचा संस्कृत भाषेचा अभ्यास झाला. याशिवाय इंग्रजी साहित्याचे विपुल वाचन त्यांनी त्या वेळी केले. त्यांच्या शिक्षकवर्गात विष्णुशास्त्री चिपळूणकर, बाळ गंगाधर टिळक, गोपाळ गणेश आगरकर, वासुदेवशास्त्री खरे, वा. शि. आपटे यांच्यासारखे व्यासंगी मान्यवर होते. विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या निबंधमालेचे वाचन हरिभाऊंनी मनःपूर्वक केले. परिणाम स्वरूप स्वभाषा, स्वधर्म व स्वदेश ह्यासंबंधींचा हरिभाऊंचा अभिमान वाढीस लागला. विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या अकाली अकाली निधनामुळे व्यथित झालेल्या हरिभाऊंनी 'शिष्यजनविलाप' हे ८४ श्लोकांचे वृत्तबद्ध काव्य लिहिले. १८८३ साली मॅट्रिक झाल्यावर त्यांनी डेक्कन महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. गणित विषय कच्चा असल्यामुळे पहिल्या परीक्षेत अपयश आले. पुढे फर्गसन कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यावरही हरिभाऊ पदवी परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. मात्र विद्याव्यासंगी शिक्षक- प्राध्यापकांचे मार्गदर्शन आणि संस्कृत-मराठी-इंग्रजी भाषांतील ग्रंथांच्या वाचनामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळाली. हरिभाऊंचा आगरकरांच्या 'विकारविलसित' ह्या नाटकावरील ७२ पानी विस्तृत सडेतोड टीकालेख 'निबंध- चंद्रिकेत १९८२ साली प्रसिद्ध झाला. याच काळात 'आर्योद्धारक नाटक मंडळी'त हरिभाऊंचे बसणे, उठणे सुरू झाले. त्याचा लाभ पुढे नाटके लिहिताना त्यांना झाला. १८७८ साली पुण्यात आल्यापासून १८८८ साली डेक्कन महाविद्यालय सोडेपर्यंत त्यांचा दहा वर्षांचा कालखंड साहित्यिक घडणीचा काळ होता. ह्या काळात हरिभाऊ हे चिपळूणकरांच्या शैलीचे आणि त्यांच्या पूर्ववैभवाच्या शिकवणुकीचे भक्त बनले होते. लेखन-वाचनाची हरिभाऊंची आवड लक्षात घेऊन त्यांचे चुलते महादेव चिमणाजी आपटे यांनी त्यांना पुस्तक प्रकाशनाचा व्यवसाय करावा, असे सुचवले. त्यासाठी छापखान्याच्या कामाचे स्वरूप जाणून घ्यावे, म्हणून मुंबईच्या 'जगदीश्वर' छापखान्यात सहा महिने उमेदवारी केली. पुतण्याला लेखन- वाचन निर्वेधपणे करता यावे, म्हणून महादेव चिमणाजींनी एक-दोन लाख रुपये खर्च करून इमारत बांधून दिली आणि तिथेच 'आनंदाश्रम' संस्थेची स्थापना केली. प्राचीन ग्रंथाचे रक्षण- प्रकाशन व्हावे, ह्या हेतूने सुरू केलेल्या संस्थेत हरिभाऊंची व्यवस्थापक म्हणून नेमणूक केली गेली. त्या पदामुळे हरिभाऊंना बरेच अर्थिक स्थैर्य लाभले आणि त्यांनी आयुष्याच्या अखेरपर्यंत साहित्यविषयक भरीव कार्य केले.
 १८९० साली विजयादशमीच्या मुहूर्तावर हरिभाऊंनी 'करमणूक' साप्ताहिकाचा नमुना अंक प्रसिद्ध केला. 'लहानांपासून थोरांपर्यंत सर्व स्त्री-पुरुषांचे मनोरंजन करून ज्ञानदान देणारे पत्र' अशी टीप सुरुवातीला दिली होती. 'करमणूक'मध्ये हरिभाऊंच्या कादंबऱ्या क्रमशः प्रसिद्ध झाल्या; त्यांच्या स्फुट कथा व अन्य लेखकांचे साहित्य प्रसिद्ध झाले. 'मासिक मनोरंजन', 'निबंध-चंद्रिका' ह्या नियतकालिकांत आधी स्फुट लेखन करणाऱ्या हरिभाऊंनी पुढे स्वतंत्रपणे दीर्घ लेखनाला प्रारंभ केला. 'मिस्टरीज ऑफ ओल्ड लंडन'च्या धर्तीवरील 'मधली स्थिती' ही कादंबरी 'पुणे वैभव' साप्ताहिकाची पुरवणी म्हणून प्रसिद्ध झाली. 'मधली स्थिती'चा जनमानसावरील प्रभाव जाणवल्यावर कादंबरी हा वाङ्मयप्रकार जनजागृती, उद्बोधन आणि समाजाला मार्गदर्शन करण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल; अशी हरिभाऊंची भावना झाली. समाज- स्थितीचे सूक्ष्म अवलोकन, वाङ्मय आणि इतिहासावरील ग्रंथांचे भरपूर वाचन, मनोरंजनाबरोबर येणाऱ्या बोधपरतेची आकांक्षा, समाजहिताची आंतरिक तळमळ आणि वर्तमानातील व भूतकाळातील वास्तवाचे प्रत्ययकारीपणे दर्शन घडविण्यासाठी आवश्यक असणारी प्रतिभेची देणगी या गुणांमुळे हरिभाऊंनी स्फुट गोष्टी, सामाजिक आणि ऐतिहासिक विषयांवरील कादंबऱ्या,

शिल्पकार चरित्रकोश
२७