पान:शिल्पकार चरित्रकोश खंड २ – साहित्य.pdf/१७३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अ- औ

आपटे, हरी नारायण
साहित्य खंड
 

नाटक असे विविधांगी लेखन केले. 'करमणूक'चे अठ्ठावीस वर्षे निष्ठापूर्वक संपादन केले. हरिभाऊंचा व्यासंग केवळ साहित्य आणि तत्संबंधी विषयांपुरता मर्यादित नव्हता. जगाचा राजकीय, आर्थिक, सामाजिक, धार्मिक, वैज्ञानिक, सांस्कृतिक इतिहास त्यांनी नजरेखालून घातला होता.
मराठी कथेला वास्तववादी वळण
 आपल्या 'स्फुट गोष्टीं'नी हरिभाऊ आपटे यांनी मराठी कथेचा पाया घातला. वास्तववादी सामाजिक कादंबऱ्या लिहून आधुनिक कादंबरीचे जनक आणि आशयसंपन्न ऐतिहासिक कादंबरीचे प्रवर्तक म्हणून मान्यता मिळवली. 'संगीत संत सखू' (१९११), 'संगीत सती पिंगळा' ही दोन स्वतंत्र नाटके त्यांनी लिहिली. मराठी 'वाङ्मयाचा इतिहास' (१९०३), 'विदग्ध वाङ्मय' (१९११), 'मराठी इट्स सोअर्सिस ॲन्ड डेव्हलपमेन्ट' भाषाशास्त्रविषयक व्याख्यान आदींवरून हरिभाऊंच्या वाङ्मयविषयक भूमिकेची आणि सखोल अभ्यासाची साक्ष पटते. 'करमणुकी'त प्रसिद्ध होणाऱ्या स्फुट कथांनी तत्कालीन कल्पनारम्य वातावरणात रमलेल्या मराठी कथेला जीवनातील वास्तव शोधण्यास शिकवले. 'काळ तर मोठा कठीण आला', 'कसे दिवस गेलें, 'डिस्पेप्शिया', 'पुरी हौस फिटली' ह्यांसारख्या त्यांच्या स्फुटगोष्टींत वा दीर्घकथांत साधी घरगुती भाषा, उत्कृष्ट स्वभाव रेखाटन, वास्तव चित्रण व चटकदार निवेदन हे लेखन - विशेष आढळून येतात. 'स्फुट गोष्टी: भाग १ - ४' (१९१५) ह्या संग्रहात हरिभाऊंच्या स्फुट कथांचा समावेश आहे.
 'पण लक्ष्यांत कोण घेतो' (१८९० - १८९३) ह्या कादंबरीनंतर हरिभाऊंनी पुढील सात सामाजिक कादंबऱ्या लिहिल्या 'गणपतराव': (१८८६ - १८९३), 'यशवंतराव खरे' (१८९२ - १८९५), 'मी' (१८९३- १८९५), 'जग हे असें आहे' (१९९७-१९९९), 'भयंकर दिव्य' (१९०१-१९०३), 'आजच' (१९०४-१९०६, अपूर्ण), 'मायेचा बाजार' (१९१० - १९१२), 'कर्मयोग' (१९१३ - १९१७, अपूर्ण); ह्या सर्व कादंबऱ्या 'करमणुकी'त आधी क्रमशः प्रसिद्ध झाल्या आणि नंतर त्या पुस्तकरूपात प्रसिद्ध करण्यात आल्या.
 सामाजिक कादंबऱ्यांप्रमाणे हरिभाऊंनी पुढील ऐतिहासिक कादंबऱ्या लिहिल्या 'म्हैसूरचा वाघ' (अपूर्ण) ही मेडोज टेलरच्या 'टिपू सुलतान' ह्या कादंबरीवर आधारित हरिभाऊंची पहिली ऐतिहासिक कादंबरी १८९५ साली प्रसिद्ध झाली. 'उषःकाल' (१८९५-१८९७), 'केवळ स्वराज्यासाठी' (१८९८- १८९९), 'रूपनगरची राजकन्या' (१९००-१९०२), 'चंद्रगुप्त' (१९०२ - १९०५), 'गड आला पण सिंह गेला' (१९०३ - १९०४), 'सूर्योदय' (१९०५- १९०६), 'मध्यान्ह' (अपूर्ण, १९०६-१९०८); 'सूर्यग्रहण' (अपूर्ण, १९०८-१९०९), 'कालकूट' (अपूर्ण,१९०९-१९११), 'वज्राघात अथवा विजयनगरचा विनाशकाल' (१९१३ - १९१५).
युगप्रवर्तक कादंबरी
 हरिभाऊंच्या 'करमणूक'मध्ये क्रमशः प्रसिद्ध झालेल्या कादंबऱ्या ग्रंथरूपात आल्यावर त्यांच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. हरिभाऊंचा पिंड आदर्शवादी सुधारकाचा होता. वृत्ती सात्त्विक आणि सौजन्यशील होती. आपल्या कादंबऱ्यांतून त्यांनी 'सत्'चे चित्रण केले. त्यांच्या कादंबऱ्यांतील जग हे मध्यमवर्गीयांचे जग आहे; या समाजघटकातील स्त्री-पुरुषांच्या, प्रामुख्याने स्त्रियांच्या समस्या त्यांनी मांडल्या. हरिभाऊ केवळ वास्तवाचे रेखाटन करणारे कादंबरीकार नव्हते. भोवतीच्या समाजस्थितीचे चित्र समाजापुढे मांडून त्यातील गुणदोषांकडे वाचकांचे लक्ष वेधले आणि साद्य: स्थितीतून उत्क्रांती करण्यासाठी, ध्येयसिद्धी करण्यासाठी काय केले पाहिजे; याचे दिग्दर्शन त्यांनी कादंबऱ्यांतून केले. 'पण लक्ष्यांत कोण घेतो' आणि 'मी' ह्या हरिभाऊंच्या दोन कादंबऱ्या मराठीतील लक्षणीय सामाजिक कादंबऱ्या आहेत. रूढीबद्ध मध्यमवर्गीय सनातनी कौटुंबिक जीवनाच्या सूक्ष्म निरीक्षणातून निर्माण झालेली 'पण लक्ष्यांत कोण घेतो' ही वास्तववादी कथेतून सामाजिक


२८
शिल्पकार चरित्रकोश