पान:शिल्पकार चरित्रकोश खंड २ – साहित्य.pdf/२६९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

केळकर, नरसिंह चिंतामण
साहित्य खंड
 

सांगणारे आणि पतिपरायण संसारी स्त्रीचे साधेसुधे जिव्हाळ्याने भरलेले हे आत्मनिवेदन आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे १९२८ साली मुंबईत भरलेल्या नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद गिरिजाबाईंना देऊन त्यांचा गौरव करण्यात आला होता.

-वि. ग. जोशी.

संदर्भः

  1. खानोलकर गं. दे.; 'मराठी वाङ्मय सेवक, खंड १.




केळकर, नरसिंह चिंतामण
कवी, नाटककार, कथाकार, कादंबरीकार
२४ ऑगस्ट १८७२ - १४ ऑक्टोबर १९४७

'साहित्यसम्राट' या विशेषणाने निरपवादपणे गौरविले गेलेले मराठीतील एकमेव साहित्यिक नरसिंह केळकर यांचा जन्म पंढरपूरजवळ मोडलिंब येथे झाला. केळकरांचे शालेय शिक्षण मिरज येथे झाले. १८८८ मध्ये ते मॅट्रिक झाले. कोल्हापूर व पुणे येथे महाविद्यालयीन शिक्षण घेऊन १८९१ मध्ये ते बी. ए. झाले व १८९५ साली एलएल. बी होऊन त्यांनी सातारा जिल्ह्यात वकिलीची सनद घेतली. १८९६ च्या मार्चमध्ये लोकमान्य टिळकांच्या बोलावण्यावरून केळकर त्यांच्या कार्यात त्यांना साहाय्य करू लागले.
 'साहित्यसम्राट' या बिरुदास शोभेल असाच केळकरांचा साहित्यक्षेत्रातील संचार होता. त्यांच्या लेखणीला कुठलाच अविषय नव्हता. वृत्तपत्रीय लेखन, नाट्यलेखन, कादंबरी लेखन, कविता-लेखन, इतकेच नव्हे तर चित्रपट कथालेखनापर्यंत अनेक प्रकारची लेखनक्रीडा त्यांनी उत्साहाने केली. त्यांच्या लेखणीचे सामर्थ्य व सौंदर्य व्यक्त करणारा साहित्य प्रकार म्हणजे- निबंध होय. हा निबंध तर्क- अनुमान- प्रमाणादिनी निबद्ध आहे. ज्ञानलालसा, बहुश्रुतता, युक्तिवादकौशल्य, विनोदबुद्धी, भाषाप्रभुत्व आणि समाजशिक्षणाची ओढ या गुणांमुळे निबंधकार म्हणताच केळकर डोळ्यांपुढे येतात. राजकारण, सामाजिक सुधारणा, आर्थिक प्रश्न, नवनवीन कायदे, प्रासंगिक घडामोडी इत्यादींसंबंधी केळकरांनी जे- जे लिहिले. ते ते वाचताना केळकर हे आदर्श लोकशिक्षक होते, हे जाणवत राहते. त्यांच्या लेखणीत निर्भयता होती परंतु बेतालपणा नव्हता. त्यांच्या वृत्तपत्रीय निबंधांतून औचित्य, सदभिरुची व प्रमाणबद्धता या गुणांचा विकास घडला. वृत्तपत्रकार म्हणून केळकरांना मिळालेल्या यशाचे रहस्य त्यांच्या सुपूर्त व समर्पक बहुश्रुतपणात आणि प्रवाही व प्रत्युत्पन्न लेखणीत सामावलेले आहे. 'संस्कृत विद्येचे पुनरुज्जीवन', 'कौन्सिलातील शकुन्तलाख्यान', 'स्वराज्यद्रोही छत्रपती', 'भविष्यकथन', 'कलियुगातील पंधरावी कला', 'लोकमताने कुस्ती जिंकली', 'मुरलीधर की गारुडी' यांसारखे बहुविध विषयांवरचे केळकरांचे लेखन अभिजात सौंदर्याने नटलेले आहे. त्यांची भाषा प्रासादिक व उपमा- दृष्टान्तांनी नटलेली होती.
टागोरांच्या 'सरोजिनी' या नाटकाचे भाषांतर आणि शेरिडनच्या 'टू रायव्हल्स' या नाटकाचा अनुवाद करून केळकरांनी आपल्या नाट्यलेखनाला सुरुवात केली. 'तोतयाचे बंड' (१९१२), 'कृष्णार्जुनयुद्ध' (१९१५), 'वीरविडम्बन' (१९१९), 'संत भानुदास' (१९१९) ही त्यांची चार स्वतंत्र नाटके, याशिवाय 'चंद्रगुप्त' (१९१३) व 'अमात्यमाधव' (१९१५) अशी एकूण सहा नाटके प्रयोगरूपाने रंगभूमीवर आली. याशिवाय 'नवरदेवाची जोडगोळी' (१८९८) व 'पतीची निवड' (१९५०) हीही नाटके त्यांनी लिहिली. कथानकाच्या वळणाने येणाऱ्या संवादांवाचून त्यांच्या नाट्यकृतींत फारसे काही हाती लागत नाही. मराठी नाट्येतिहासात केळकरांची नाट्यनिर्मिती फारशी प्रभावी ठरली नाही. 'तोतयाचे बंड' एवढेच त्यांचे नाटक उल्लेखनीय म्हणता येईल. 'नवलपूरचा संस्थानिक' (१९३४), 'बलिदान' (१९३७), 'कावळा व ढापी' (१९४०), 'कोकणचा पोर' (१९४२), 'जगाची रीत' (१९४३) या पाच पूर्ण


१२४
शिल्पकार चरित्रकोश