पान:शिल्पकार चरित्रकोश खंड २ – साहित्य.pdf/६४४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

साहित्य खंड
मर्ढेकर, बाळ सीताराम
 

कादंबरीकार, नभोनाट्यलेखक, सौंदर्यशास्त्राचे चिकित्सक-समीक्षक म्हणूनही त्यांचे कर्तृत्व विशेष लक्षणीय आहे.
 त्यांचा जन्म खानदेश जिल्ह्यातील फैजापूर येथे झाला. मर्ढेकरांचे मूळ घराणे सातारा जिल्ह्यातील मर्ढे या गावचे. त्यांच्या घराण्याचे मूळ उपनाम गोसावी होते. बा. सी. मर्ढेकरांचे चुलत चुलते उपजिल्हाधिकारी होते. त्यांनीच गोसावीऐवजी मर्ढेकर हे उपनाम प्रथम स्वीकारले. पुढे त्यांचे घराणे मर्ढेकर या नावाने ओळखले जाऊ लागले. मर्ढेकरांचे वडील सीतारामपंत हे प्राथमिक शिक्षक होते. शाळा तपासनीस म्हणूनही त्यांनी कार्यभार पाहिला. त्यांच्या खानदेशातील नोकरीमुळे मर्ढेकरांचे प्राथमिक शिक्षण बहादूरपूर येथे तर इंग्रजी तिसऱ्या इयत्तेपर्यंतचे शिक्षण फैजपूर-सावदे येथे झाले. पुढे धुळे येथील गरुड हायस्कुलात त्यांनी मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण घेतले. बा. सी. मर्ढेकरांचे मूळ नाव 'रमेश' होते. घरी त्यांना 'बाळ' या नावाने संबोधले जात असे; त्यामुळे तेच नाव पुढे सर्वतोमुखी झाले. शाळेत असताना मर्ढेकरांनी त्यामुळेच 'रमेश-बाळ' या टोपणनावाने लेखन केले.
 शालेय जीवनातच त्यांच्यावर भाषेचे आणि वाङ्मयाचे संस्कार झाले. पुण्याच्या फर्गसन महाविद्यालयातून (१९२४-१९२८) त्यांनी मुंबई विद्यापीठाची पदवी १९२८ साली प्राप्त केली. उप-जिल्हाधिकारी असणाऱ्या आपल्या चुलत चुलत्याच्या प्रेरणेने आय. सी. एस. होण्यासाठी म्हणून कर्जाऊ मदत घेऊन ते इंग्लंडला गेले. पण दोन वेळा परीक्षेस बसूनही त्यांना यश मिळाले नाही. आय. सी. एस. परीक्षेत इंग्रजी वाङ्मयाच्या पेपरमध्ये मात्र त्यांनी विक्रम नोंदवला. या काळात इंग्रजी वाङ्मय, मानसशास्त्र, इटालियन, फ्रेंच व स्कैंडेनेव्हिअन ह्या भाषांचा व त्यांतील साहित्याचा त्यांनी सखोल अभ्यास केला. त्यातून त्यांचा वाङ्मयीन व वैचारिक पिंड घडला. प्रा. जेम्स सदरलॅन्ड यांच्या विचारांचा प्रभावही त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर पडला. त्यांनी युरोपात चित्रसंग्रहालये पाहिली आणि सौंदर्यशास्त्राच्या अभ्यासार्थ इटलीत वास्तव्य केले. सौंदर्याचे स्वरूप व आस्वादनाबद्दलची त्यांची मते त्यातूनच घडली. विलायतेहून परतल्यानंतर त्यांनी 'टाइम्स ऑफ इंडिया' या मुंबईच्या वृत्तपत्रात उपसंपादक म्हणून काही काळ कार्य केले. मुंबईच्या एल्फिन्स्टन, जोगेश्वरीच्या इस्माइल, अहमदाबादच्या सिडनहॅम व धारवाड येथील कॉलेजात त्यांनी अध्यापन कार्य केले.
 १९३८ साली आकाशवाणीच्या मुंबई केंद्रात कार्यक्रम नियोजक म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली. आणि आयुष्याच्या अगदी अखेरपर्यंत म्हणजे जवळजवळ १८ वर्षे एक कर्तबगार अधिकारी म्हणून त्यांनी कार्य केले व आपला ठसा उमटवला. कोलकाता, पटणा, त्रिचनापल्ली, दिल्ली येथील आकाशवाणी केंद्रांवर त्यांनी कार्य केले.
 मर्ढेकरांचा पहिला विवाह १९४० साली होमाय नल्लाशेठ या त्यांच्या पारशी विद्यार्थिनीशी झाला. पण तो फार काळ टिकला नाही. १९४९ साली त्यांनी घटस्फोट घेतला. त्यांच्या खात्यातीलच अंजना सयाल यांच्याशी १९५२ साली त्यांनी दुसरा विवाह केला. १० फेब्रुवारी १९५३ रोजी त्यांना पुत्रलाभ झाला. त्याचे नाव राघव असे ठेवले.
 'शिशिरागम' हा मर्ढेकरांचा पहिला कवितासंग्रह १९३९ साली प्रकाशित झाला. त्यानंतर 'कांही कविता' (१९४७), 'आणखी काही कविता' (१९५१) हे त्यांचे काव्यसंग्रह निघाले. या तिन्ही संग्रहांतील एकूण १२६ कविता व कवितासंग्रहांत समाविष्ट न झालेल्या सहा कविता, अशा एकूण १३२ कविता मर्ढेकरांच्या नावावर आहेत. 'रात्रीचा दिवस' (१९४२), 'तांबडी माती' (१९४३), 'पाणी' (१९४८) या कादंबऱ्या; 'कर्ण' (१९४४), 'संगम' (१९४५), 'औक्षण' (१९४६), 'बदकांचे गुपित' (१९४७) या संगीतिका त्यांनी लिहिल्या. त्यांचा 'नटश्रेष्ठ व इतर संगीतिका' हा


शिल्पकार चरित्रकोश
४९९