पान:शिल्पकार चरित्रकोश खंड २ – साहित्य.pdf/६४५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मर्ढेकर, बाळ सीताराम
साहित्य खंड
 

संगीतिकांचा संग्रह प्रकाशित झाला आहे. 'आर्ट्स ॲन्ड मॅन' (१९३७), 'वाङ्मयीन महामत्ता' (१९४१), 'टू लेक्चर्स ऑन ॲन इस्थेटिक ऑफ लिटरेचर' (१९४१), 'सौंदर्य आणि साहित्य' (१९५५) या समीक्षात्मक आणि सौंदर्यशास्त्रीय ग्रंथांची निर्मिती त्यांनी केली.
 मर्ढेकरांच्या 'शिशिरागम' या कवितासंग्रहावर रविकिरण मंडळाचा प्रभाव जाणवतो. त्यात माधव जूलियनांचे मर्ढेकर हे चाहते होते. त्यामुळे त्यांचा प्रभाव विशेषत्वाने त्यांच्या या सुरुवातीच्या संग्रहातील कवितांवर दिसतो. पुढील संग्रहांतून मात्र मर्ढेकरांनी कवितेची आपली अशी स्वतंत्र वाट चोखाळत आपल्या नावाची स्वतंत्र मुद्रा उमटवली.
 मानवी जीवनातील क्षुद्रतेचे, हीनतेचे, उद्ध्वस्ततेचे भेदक चित्रण करीत असतानाच शाश्वत जीवनमूल्यांविषयी गाढ श्रद्धा त्यांच्या कवितेतून व्यक्त झाली आहे. यंत्रयुगाने निर्माण केलेली दुःखे आणि वैफल्य यांचा कधी आर्त तर कधी उपहास- उपरोधाच्या साहाय्याने आविष्कार करणारी मर्ढेकरांची कविता वृत्तीने चिंतनशील आहे. आध्यात्मिक मूल्यांबद्दल वाटणारी ओढ हादेखील मर्ढेकरांच्या कवितेचा एक लक्षणीय विशेष होय. संतवाङ्मयातील कळकळ, लोकवाङ्मयातील आवेश व पाश्चात्त्य वाङ्मयातील प्रतिमानिर्मितीचे सामर्थ्य, आध्यात्मिक व आधुनिक विज्ञान-संस्कृतीतील तात्त्विक विचारधन यांतून प्रतिबिंबित होणारा आशय दुर्दम्य आशावाद व मांगल्यपूजनाचा अंगभूत गुण यांमुळे मर्ढेकरांची कविता विशेष लक्ष वेधून घेते.
 मर्ढेकरांच्या कवितेवर दुर्बोधतेबरोबरच अनेक आक्षेप सुरुवातीच्या काळात घेण्यात आले. परंतु तिचे महनीयत्व काळाबरोबरच जाणत्या साहित्यरसिकांनीही नंतर अचूक जोखले. मर्ढेकरांच्या सर्जनशील मनाने तात्त्विक, साम्यवादी जाणिवांचे दर्शन आपल्या कवितेतून घडवले. वर्तमानाला बिनदिक्कतपणे भिडण्याची त्यांच्या कवितेची वृत्ती ही मराठी काव्यपरंपरेला नवी होती. व्यक्तिगत भावानुभवांचे व्यापक आणि व्यापक जीवनजाणिवांचे व्यक्तिगत स्तरावरील आविष्करण हा त्यांच्या सर्जन प्रकृतीचा धर्म होता. व्यामिश्र जाणिवांच्या अभिव्यक्तीसाठी त्यांनी प्रतिमा, प्रतीक, शीर्षक, प्राक्कथा, भारतीय- अभारतीय संदर्भ, निसर्ग संवेदना यांचा अत्यंत कलात्मक स्तरावर उपयोग करून घेतला. यंत्रयुगातील गतिमानतेत हरपत चाललेल्या सौंदर्याची व माणुसकीची खंत त्यांनी आपल्या कवितांमधून अत्यंत नावीन्यपूर्ण व प्रभावी शैलीत टिपली.
 नव्या शब्दांची घडण, शब्दांची मोडतोड, बहुभाषा संकरातून सिद्ध झालेली भाषा, उपमा, विशेषणे, क्रियाविशेषणे, म्हणी यांचे कलापूर्ण उपयोजन हे त्यांच्या कवितेचे एक ठळक वैशिष्ट्य म्हणता येईल. या अभिनव प्रयोगांमुळेही मर्ढेकर टीकेचे धनी झाले. पण, त्यातील कलाप्रत्यय निर्विवाद मोठा आहे. मर्ढेकरांच्या भावानुभवात खिन्नता, क्षोभ, त्वेष, उपरोध असला; तरी संतांची करुणा आणि मांगल्यपूजकता तसेच वैज्ञानिक दृष्टीचे वरदानही आहे.
 मर्ढेकरांच्या कादंबऱ्यांमधून भिन्नभिन्न जीवनसरणी, संमिश्र समाज, ग्रामीण आणि नागरी जीवन, यंत्रयुगाने उद्ध्वस्त झालेले मानवी जीवन, मानवी मनातील गुंतागुंतीचा वेध, जीवनातील अनिश्चितता, असंबद्धता, आभासमयता, अगतिकता, संभ्रम अशा विविध विषयांवर प्रकाश टाकला गेला आहे. रेखीव व्यक्तिदर्शने, दांभिकतेचे चित्रण आणि संज्ञाप्रवाहाचे कलात्मक उपयोजन हीदेखील त्यांच्या कादंबरी वाङ्मयातील काही वैशिष्ट्ये होत.
 'नटश्रेष्ठ अप्पासाहेब रेळे' या शीर्षकाची लघुकथाही मर्ढेकरांनी लिहिली. मनोविश्लेषणात्मक स्वरूपाची ही कथा आहे. या लघुकथेवरूनच त्यांनी 'नटश्रेष्ठ' हे चार अंकी नभोनाट्य लिहिले. त्यांनी 'कर्ण' ही पहिली संगीतिका लिहिली. त्यामुळे नवकवितेप्रमाणेच नभोनाटिकांचे प्रणेते म्हणूनही त्यांची ओळख आहे. 'संगीतिका' हा नवा वाङ्मयप्रकार त्यांनी मराठीत आणला. आकाशवाणीवरील नोकरीत असताना आकाशवाणीवर कादंबरीवाचनाचा उपक्रम त्यांनी सुरू केला. डॉ. ग. य. चिटणीस यांची 'कुसुम' ही कादंबरी


५००
शिल्पकार चरित्रकोश