पान:शिल्पकार चरित्रकोश खंड २ – साहित्य.pdf/६४६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

साहित्य खंड
महांबरे, गंगाधर मनमोहन
 

त्यांनी वाचली. आकाशवाणीवरील अभिवाचनाचा तो एक आदर्श मानला जातो. त्यांनी पार्श्वसंगीताचे वेगवेगळे प्रयोग केले.
 मर्ढेकरांच्या समीक्षात्मक लेखनात सौंदर्यशोध, साहित्यसिद्धान्त आणि प्रत्यक्ष समीक्षा असे त्रिविध स्वरूपाचे लेखन समाविष्ट आहे. त्यांनी ललितकलांचा एकत्रित विचार करून त्या अनुषंगाने साहित्यविषयक चर्चा केली आहे. 'सौंदर्य हे ललितकलांचे स्वायत्त मूल्य आहे', हा विचार त्यांनी मांडला. सौंदर्यमूल्य मांडताना त्यांनी सौंदर्यभावनेचे स्वरूपही उलगडून दाखवले आहे. अनुभवातील इंद्रियसंवेदनांच्या गुणधर्माची संगती संवाद-विरोध- समतोल या लयतत्त्वांच्या अनुरोधाने लावली की, सौंदर्याचा अनुभव, येतो. असा लयतत्त्वाचा सिद्धान्त त्यांनी मांडला. कलावंताची प्रतिभा 'भावनानिष्ठ समतानता' निर्माण करते. असे मत त्यांनी मांडले.
 मर्ढेकरांनी शुद्ध कलावादी भूमिका मांडली. नावीन्य, वाङ्मयीन महात्मता, वाङ्मयीन तादात्म्य या संकल्पना त्यांनी विशद केल्या. बालकवी, माधव जूलियन यांच्या कवितेची त्यांनी समीक्षा केली. ग. दि. माडगूळकर व गंगाधर गाडगीळ यांच्याविषयी लिहिण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली होती. कलाद्रव्य आणि कलामाध्यम यांतील भेद स्पष्ट करताना त्यांनी, 'शब्द हे साहित्याचे साधन आणि भावनात्मक अर्थ हे साहित्याचे माध्यम होय', असे म्हटले. 'सौंदर्य आणि साहित्य' या त्यांच्या ग्रंथास साहित्य अकादमी पुरस्काराचा सन्मान लाभला.
 मर्ढेकरांच्या 'कांही कविता' या संग्रहातील नवकवितांवर अश्लीलतेचा आरोप ठेवून त्यांच्यावर खटला भरण्यात आला (१९४८). तो त्या काळात खूपच गाजला. मर्ढेकरांनी त्याला मोठ्या धैर्याने तोंड दिले व त्यातून ते निर्दोष ठरले. परंतु या खटल्याचा मानसिक त्रास मर्ढेकरांना खूप झाला. त्याचा परिणाम मर्ढेकरांच्या सर्जनशीलतेवरही झाला. १९४८ ते १९५६ या काळात त्यामुळेच मर्ढेकरांच्या प्रतिभेचा पूर्वीचा बहर पाहायला मिळत नाही.
 कामाचा अतिरिक्त ताण, रक्तदाब व काविळीची लागण यांमुळे दिल्ली येथील रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली.
 मराठी कवितेत मूलभूत बदल घडवून आणणारे प्रवर्तक, पृथगात्म अनुभवाच्या प्रकटीकरणासाठी भाषासंकराचे प्रयोग करूनही आपले जातिवंत मराठीपण अबाधित राखणारा कवी, मानवी मूल्यांवर गाढ श्रद्धा असणारा कलावंत, मराठी टीकादृष्टीला 'संस्कारवादी' दृष्टिकोनाकडून 'दर्शनवादी' टीकेकडे नेणारा थोर समीक्षक म्हणून बा. सी. मर्ढेकरांचे स्थान अद्वितीय आहे.

- प्रा. डॉ. सुहास गोविंद पुजारी

संदर्भ:

  1. मनोहर यशवंत 'बा. सी. मर्ढेकर'; साहित्य अकादमी, दिल्ली; १९८७.
  2. महाम्बरे गंगाधर; पायाभरणीचे दिवस; साहित्यसूची- दिवाळी- १९९९.

महांबरे, गंगाधर मनमोहन,
कवी, गीतकार, नाटककार, बालसाहित्यकार
३१ जानेवारी १९३१ - २२ डिसेंबर २००८

 चटकदार गाण्यांचे रचनाकार आणि चतुरस्र लेखक म्हणून प्रसिद्ध असलेल्या असलेल्या गंगाधर मनमोहन महांबरे यांचा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे झाला. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मालवण येथे झाले. १९४८ साली शालान्त परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यांनी पुढे १९५६ मध्ये पुणे विद्यापीठातून बी. ए. ची पदवी मिळवली. त्यांनी प्रारंभी मुंबईला शिक्षण विभागामध्ये नोकरी केली. एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये विविध पदांवर नोकरी करून ग्रंथालय शास्त्रातील पदविका मिळवली. पुढे त्यांनी पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये, किर्लोस्कर ऑइल इंजिनच्या ग्रंथालयात तसेच पुण्याच्या ऑटोमोटिव्ह रिसर्च


शिल्पकार चरित्रकोश
५०१