पान:शिल्पकार चरित्रकोश खंड २ – साहित्य.pdf/७७०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

साहित्य खंड
सरदेसाई, गोविंद सखाराम
 

 १. त्यांची कथानके पात्रांच्या व्यक्तिमत्त्वदर्शनाला शरण गेलेली आहेत.
 २. हे व्यक्तिमत्त्वदर्शन अतिबौद्धिकतेचा पांगुळगाडा डावलून सुजाणपणे भावात्मक झालेले आहे.
 ३. परिणामस्वरूप गडकऱ्यांची ही संसारनाटके एका अंगाने व्यक्तींचे मनोमंथन करीत विकसू पाहतात, तर दुसऱ्या बाजूला नैतिक-आत्मिक समस्यांचे उलट-सुलट फासे मांडून संसाराचा सारिपाट कसा बिकट आहे, याचे दर्शन घडवितात.
 व्हिक्टर ह्यूगो ह्या फ्रेंच लेखकाची 'हसणारा' या नावाची एक कादंबरी आहे. तिचे सरदेशमुखांनी केलेले 'थैमान' हे नाट्यरूपांतर आहे. त्याचा नायक ज्या व्यक्तींपाशी आणि ज्या परिस्थितीत मोठा होतो, त्या व्यक्तींचा आणि परिस्थितीचा साम्यांश या नाटकाचा आधार आहे, असे ते म्हणतात.
 'प्रदेश साकल्याचा' या समीक्षणात्मक पुस्तकात सरदेशमुखांचे सहा लेख आहेत. त्यांचे म्हणणे असे की, "मी साहित्याचा आणि समीक्षेचा जीवनाशी असलेला संबंध शोधण्याचा प्रयत्न या पुस्तकात केलेला आहे. तसेच कलाकृती आणि तिची समीक्षा वाचकाची जाणीव संपन्न व विस्तृत करतात."
 'बखर एका राजाची' ही त्यांची सर्वोत्तम म्हणून गाजलेली कादंबरी आहे. आपल्या देशातील राजघराणी कालपरवा इतिहासात विलीन झाली. तसल्या राजकुळातील एका स्मृतिशेषाची ही शोकात्म आणि शोकांत कहाणी आहे. लेखकाने ती आत्मनिवेदनात्मक पद्धतीने लिहिलेली आहे. या कादंबरीचा नायक- संस्थानचा राजा भोवतीच्या परिस्थितीने त्याला स्वतःचे अस्तित्वच शारीरिक आणि मानसिक पातळीवर निरर्थक आणि कृतिशून्य वाटल्याने, अखेरीस तो आत्महत्या करतो, असे दाखविलेले आहे.
 अशा रीतीने आपल्या बहुविध लेखनाने श्री. सरदेशमुखांनी मराठी वाङ्मयात आपले एक स्थान निर्माण केलेले आहे.

- शशिकांत मांडके

संदर्भ:

  1. सरदेशमुख त्र्यं. वि.; 'उन्हाचे दिवस आणि सावलीच्या जागा'; अबकडई-दिवाळी अंक, १९८६.
  2. ठकार निशिकांत; 'सत्त्वसंपन्न प्रतिभावंताचा सार्थ गौरव'; सामना - ११ जाने. २००४.



सरदेसाई, गोविंद सखाराम
रियासतकार, लेखक
१७ मे १८६५ १९ नोव्हेंबर १९५९

 रियासतकार गोविंद सरदेसाई यांचा जन्म गोविल (जि. रत्नागिरी) येथे झाला. त्यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण रत्नागिरीला झाले. मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमधून बी. ए. ची पदवी घेतल्यावर १८८९ पासून १९२५ पर्यंत बडोदे येथे श्रीमंत सयाजीराव गायकवाड महाराजांकडे त्यांनी 'रीडर' आणि युवराजांचे 'ट्यूटर' म्हणून काम केले. सयाजीराव महाराजांबरोबर त्यांनी संपूर्ण भारत, इंग्लंड आणि युरोपाचा पाच वेळा प्रवास केला. त्यामधून जगातील विविध समाज, तेथील चालीरीती, रूढी, परंपरा यांचे जवळून निरीक्षण करण्याची संधी त्यांना मिळाली.
 नोकरी करत असतानाच त्यांनी इ. स. १००० ते १८५८ पर्यंतच्या प्रदीर्घ कालखंडाचा इतिहास लिहिण्याचे काम हाती घेतले. त्यांच्यापूर्वी लिहिल्या गेलेल्या बहुतांश ऐतिहासिक लेखनांत घटनांचे कथन करणे हाच उद्देश असे; सरदेसाईंनी मात्र घटनांचे पृथक्करण करून उपलब्ध झालेल्या पुराव्यांची यथार्थता परखडपणे पडताळून पाहिली. त्यासाठी आवश्यक असलेली चिकाटी, पूर्वग्रहविरहित दृष्टी आणि संशोधन वृत्ती त्यांच्यापाशी होती.
 मुसलमानी रियासतीमध्ये (दोन खंड) सुलतान घराणी व मोगल बादशाही असा इ. स. १००० ते १७०७ पर्यंतचा सुमारे ७०० वर्षांचा कालखंड, मराठी


शिल्पकार चरित्रकोश
६२५