पान:शिल्पकार चरित्रकोश खंड ३ – विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण.pdf/२५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आर्यभट्ट, ब्रह्मगुप्त, भास्कराचार्य यांच्या संशोधनाची माहिती आजही अनेकांना स्तिमित करून सोडते. त्यांनी उद्घोषित केलेल्या कितीतरी संकल्पना आज जगन्मान्य झालेल्या खगोलशास्त्रीय आणि विश्वारचनाशास्त्रीय संकल्पनांशी सुसंगत आहेत. आर्यभट्ट ते भास्कराचार्य हा ८०० वर्षांचा काळ आहे. इ.स.११५०मध्ये भास्कराचार्यांनी 'सिद्धान्त शिरोमणी' हा ग्रंथ लिहिला. यातील गोलाध्याय भागात खगोलशास्त्र आहे. चंद्राची त्रिज्या, त्याचे पृथ्वीपासूनचे अंतर, त्यावरील दिवसरात्रीची लांबी, बुध-शुक्र-मंगळ-गुरू-शनी या ग्रहांच्या प्रदक्षिणेस लागणारा काळ हे सारं त्यात आहे. ही मापनं आधुनिक मापनाशी खूप मिळतीजुळती आहेत. कार्ल सँगाननं आपल्या 'कॉसमॉस' या ग्रंथात प्राचीन भारतीय कालमापनाचं परिमाण आधुनिक विश्वारचनाशास्त्राच्या परिमाणाशी मिळतंजुळतं आहे असं म्हटलं आहे. पायथंगोरसचा काटकोन त्रिकोण सिद्धान्त हा इ.स.पूर्व ५५०चा आहे, तर या सिद्धान्ताचा उल्लेख भारतीय शूल्बसूत्रात आहे. शूल्बसूत्राचा काळ हा इ.स.पूर्व १५००चा आहे. आर्यभट्ट प्रथम (सहावे शतक), ब्रह्मगुप्त (इ.स.६२८), महावीराचार्य (इ.स.८५०), आर्यभट्ट द्वितीय (इ.स.८७५), श्रीधर (इ.स.१०००), भास्कराचार्य (इ.स.११५०) आणि रामानुजन (इ.स.१९००) अशी गणितातील भारतीयांची परंपरा आहे. शून्याचा शोध भारतानं लावला ही आधुनिक गणिताला वाटणारी एक क्रांतिकारी घटनाच आहे. शून्याविना गणितातील आकडे मांडणं आणि हिशेब करणं ही अशक्यप्राय गोष्ट आहे. शून्याचा शोध लागण्यापूर्वी I, II, III, IV, V, VI.X......D असे आकडे अनुक्रमे १,२,३,४,५,६..१०,५०,१००,५०० वगैरेला वापरत आणि याचे गुणाकार करण्यासाठी गावातल्या तज्ज्ञांची फौज आणून बसवावी लागे आणि दोन, चार गुणाकार करायला त्यांना दोन-दोन दिवस लागत. शून्याच्या एका शोधामुळं आज पाचवी-सहावीतला मुलगाही भराभर गुणाकार करतो आणि आता गणकयंत्र (कॅल्क्युलेटर) आल्यावर तर तो ते निमिषमात्रात करतो. संपूर्ण संगणक ० आणि १ या दोन आकड्यांवर काम करणारा आहे. अशा वेळी शून्याचं महत्त्व आणखीच प्रकर्षानं जाणवतं. अजंठा-वेरूळची लेणी, हळ्ळेबीड मंदिरातील शिल्पकाम, श्रवणबेळगोळची बाहुबलीची प्रचंड मूर्ती, दिल्लीतील कुतुबमीनारसमोरील न गंजणारा पाचव्या-सहाव्या शतकातील लोहस्तंभ, पोरस राजानं अलेक्झांडरला भेट दिलेला १४ किलो वजनाचा पोलादी तुकडा, हरप्पा- मोहोंजोदरो संस्कृतीत वापरलेले ब्राँझ, तेथील गृहरचना, पाणीपुरवठा आणि सांडपाण्याची व्यवस्था, त्या वेळी वापरली जाणारी स्वयंपाकाची भांडी, तेथले जवळचे बंदर (मोहोंजोदरो संस्कृतीचा काळ इ.स.पूर्व ३२०० ते २५०० वर्ष होय) आणि अगदी अलीकडच्या काळातील म्हणजे सतराव्या शतकात श्रीरंगपट्टणमला टिपू सुलतानाच्या काळातील क्षेपणास्त्रे. ही भारतात जुन्या काळी वेगवेगळ्या शास्त्रात झालेली प्रगती दाखवितात. परंतु, यांपैकी किती जणांची ओळख महाराष्ट्रीय अशी करता येईल, याबद्दल संदेह आहे. एक तर, महाराष्ट्र अशीच या प्रदेशाची ओळख त्या काळात झाली नव्हती. एवढंच काय, पण ‘उत्तरं यत्समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम्' अशी भारतवर्षाची व्याख्या जरी आपण करत असलो, तरी तो तसा एकसंध प्रदेश होता की काय याविषयी शंका घेण्यास जागा आहे. कारण, तसा तो असता तर मगध, कलिंग, कामरूप, दंडकारण्य अशा वेगवेगळ्या आणि एकमेकांशी झगडत असलेल्या प्रदेशांचा उल्लेख झाला नसता. त्यामुळं, त्या काळातील ज्या शिल्पकारांच्या योगदानाविषयी यत्किंचितही संदेह नाही, अशांचा महाराष्ट्राच्या शिल्पकारांत समावेश करण्याबाबत दुविधा उत्पन्न होऊ शकते. त्यामुळं आधुनिक रेनेसान्स पश्चात काळातील विज्ञानाच्या वाटचालीचाच मागोवा घ्यावयास हवा. महाराष्ट्र अशी ज्या प्रदेशाची आज आपण ओळख सांगतो, ती साधारण बाराव्या, तेराव्या शतकात दृग्गोचर झाली होती असं इतिहास सांगतो. संतवाङ्मयाचा आढावा घेतल्यास याची पुष्टी होते. पण, त्या काळात विज्ञान संशोधन होण्यासाठी २४ / विज्ञान व तंत्रज्ञान खंड शिल्पकार चरित्रकोश