पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/२५२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जोशी, श्रीधर दत्तात्रय प्रशासन खंड प्रत्येक योजनेच्या संदर्भातील अंदाजपत्रकांतील संबंधित लेखाशिष्ट पंचवार्षिक व वार्षिक योजनेच्या आराखड्यात नमूद करण्याची पद्धत जोशी यांनी सुरू केली. त्यामुळे योजनेवर केलेली तरतूद खर्च होते किंवा नाही, हे पाहणे सुलभ झाले. जून १९७८ मध्ये जोशी यांची नियुक्ती सांगलीचे जिल्हाधिकारी म्हणून झाली. राज्याच्या राजकारणात सांगली जिल्ह्याला महत्त्वाचे स्थान होते व आहे. सहकाराच्या माध्यमातून उभारलेले साखर कारखाने, काही तालुक्यात आलेली सुबत्ता, ग्रामीण भागातून पुढे आलेले नेतृत्व, गटबाजीचे राजकारण, स्वातंत्र्यसैनिकांची परंपरा ही या जिल्ह्याची वैशिष्ट्ये. प्रशासकीय अधिकार्‍यांनी नि:पक्षपणे व कोणालाही डावे-उजवे न करता प्रामाणिकपणे काम केले तर त्यांना कोणतीही अडचण येत नाही याचा अनुभव जोशी यांना आला. १९८७ व १९८९ या दोन वर्षांच्या त्यांच्या कारकिर्दीत आर्थिक व सामाजिकदृष्ट्या कमकुवत वर्गासाठी राबविल्या जाणार्‍या वीस कलमी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत सांगली जिल्ह्याचा पहिला क्रमांक आला व १९८६-१९८९ पासून राज्यशासनाने सुरू केलेले रु. पंधरा लाखांचे पहिले बक्षीस मिळवण्याचा मान सांगली जिल्ह्यास मिळाला. याच काळात भारतीय प्रशासन सेवेतील अधिकार्‍यांना त्यांच्या उत्कृष्ट सेवेसाठी, सांगली जिल्ह्याचे पहिले जिल्हाधिकारी पी. जी. चिन्मुळगुंद, आय.सी.एस. याच नावाने दिला जाणारा चिन्मुळगुंद पुरस्कार सुवर्णपदक जोशी यांना प्राप्त झाला. नद्यांतून सतत होणार्‍या वाळू उपशामुळे पर्यावरणावर होणार्‍या दुष्परिणामांचा अभ्यास, त्या वेळचे कोल्हापूर विद्यापीठाचे उपकुलगुरू पवार यांच्या साहाय्याने करण्यात आला. तसेच वाळू उत्खननाचा परवाना खाजगी व्यावसायिकाला न देता, शासनाचे आर्थिक नुकसान होऊ न देता एका बिगरशासकीय संस्थेला देण्यात आला व संस्थेतर्फे बलवडी येथे बंधारा बांधण्यास सक्रिय मदत केली व ज्या भागांतून वाळू उत्खनन केले जाते, त्या भागाचा विकास करण्याचा एक आगळावेगळा प्रयोग जोशी यांनी केला. जोशी सांगली येथे कार्यरत असतानाच राज्याचे माजी मुख्यमंत्री व सहकारमहर्षी वसंतदादा पाटील यांचे मुंबईत एक मार्च १९८९ रोजी निधन झाले. त्यांच्या देहावर सांगली येथे अंत्यसंस्कार करण्याचे ठरले. अंत्यसंस्काराची संपूर्ण तयारी करण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनावर होती. त्या दिवशी देशाचे पंतप्रधान राजीव गांधी व इतर मान्यवर सांगलीत आले. एकूण चौदा विमाने सांगलीसारख्या छोट्या शहरात उतरली. संपूर्ण जबाबदारी यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासन यांना शासनाकडून व जनतेकडून धन्यवाद मिळाले. जोशी यांनी त्यांच्या कार्यकाळात मिरज येथील संगीतरत्न अब्दुल करीम खाँ साहेब यांच्या स्मारकासाठी भरघोस मदत मिळवून दिली. मार्च १९८९ मध्ये जोशी यांची नेमणूक औरंगाबादच्या जिल्हाधिकारी या पदावर झाली. ते येथे येण्यापूर्वी औरंगाबाद शहरात मोठ्या प्रमाणावर जातीय दंगली झाल्या होत्या. जोशी यांनी त्यांच्या दोन वर्षांच्या काळात पोलिसांच्या सहकार्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न समर्थपणे हाताळला. हिंदू व मुस्लीम समाजात ऐक्य राहील यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यामुळे त्यांच्या काळात लोकसभेच्या व विधानसभेच्या निवडणुका असतानाही औरंगाबाद शहरात एकही जातीय दंगल झाली नाही. याच १९८९-९० या वर्षात कलमी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत जिल्ह्याचा विभागात प्रथम क्रमांक आल्याने रु. पाच लाखांचे बक्षीस मिळाले. याच काळात १९९१ च्या जनगणनेचे काम झाले. त्यांनी या संदर्भात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना राष्ट्रपतींचे रौप्यपदक देण्यात आले. पैठण येथे झालेला संत ज्ञानेश्वर जन्मशताब्दी सोहळा यशस्वीपणे साजरा करण्यात जोशी यांनी मोलाचे योगदान दिले. २५० शिल्पकार चरित्रकोश