पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/३६१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रशासन खंड सावरकर, विश्वास बळवंत या दोन देशांत गेला. या दोन्ही देशांसंबंधी परराष्ट्र धोरण ठरविण्यात त्यांचा मोठा पुढाकार होता. १९६६ ते १९६९ या तीन वर्षांच्या त्यांच्या चीन येथील वास्तव्यात चीनमध्ये खूप उलथापालथ सुरू होती. १९६९ मध्ये दिल्ली येथे परत येऊन त्यांनी परराष्ट्र खात्यातील अर्थ विभाग सांभाळला. १९७२ मध्ये त्यांची नेमणूक इराण येथे झाली. त्या वेळेस इराणमधील वातावरण हे भारतविरोधी होते. परंतु राम साठे यांच्या कार्यकाळात हळूहळू वातावरण निवळत गेले. ते तिथे असताना भारत व इराण दरम्यान आर्थिक संबंध निर्माण झाले. त्यातील एक महत्त्वाचे म्हणजे कुद्रेमुख लोह खनिज प्रकल्प. इराणनंतर फ्रान्स येथे ते राजदूत म्हणून नेमले गेले. परत १९७९ मध्ये एका वर्षासाठी त्यांची नेमणूक चीनमध्ये झाली. त्यानंतर राम साठे यांची नेमणूक परराष्ट्र खात्याच्या सचिव पदावर झाली. १९८२ मध्ये ते परराष्ट्र खात्यामधून निवृत्त झाले. परंतु पुढे त्यांची नेमणूक जर्मनीमध्ये राजदूत म्हणून करण्यात आली. तेथील कार्यकाळ संपल्यावर ते पुण्यात स्थायिक झाले. - आशा बापट

सावरकर, विश्‍वास बळवंत संचालक-भारतीय वन्यजीव संस्था १५ जुलै १९४३ कर्नाटकातील धारवाड या गावी एका मध्यमवर्गीय कुटुंबात विश्वास बळवंत सावरकर यांचा जन्म झाला. त्यांचे आजोबा दिनकर सावरकर यांना कैसर-ए-हिंद हा किताब मिळाला होता. नौरोसजी वाडिया महाविद्यालयाच्या संस्थापकांपैकी ते एक होते. विश्वास सावरकर यांची आई मनोरमा (पूर्वाश्रमीची गद्रे) या इंग्लिश साहित्यात नागपूर विद्यापीठातून एम.ए. होत्या. त्यांनी सुवर्णपदक मिळविले होते. मनोरमा यांच्या इंग्लिश या विषयातील गुणांची बरोबरी अजूनही कोणी करू शकलेले नाही. नंतर त्यांना इंग्लंडमधील केंब्रीज येथे पुढील शिक्षणाची संधी मिळाली. विश्वास सावरकर यांचे शालेय शिक्षण रमणबाग, पुणे येथे व महाविद्यालयीन शिक्षण नौरोसजी वाडिया महाविद्यालयात झाले. त्यांनी रसायन, पदार्थविज्ञान व भूगर्भशास्त्रात पदवी मिळवली. त्यानंतर १९६६ मध्ये त्यांनी डेहराडून येथून इंडियन फॉरेस्ट कॉलेजमध्ये पुढील शिक्षण घेतले. याच महाविद्यालयाचे नाव आता इंदिरा गांधी राष्ट्रीय वन अकादमी झाले आहे. मार्च १९६८ मध्ये या संस्थेतून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून ते नाशिक येथे नाशिक वन विभागात सह वन संरक्षक (असिस्टंट कॉन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट) या पदावर रुजू झाले. विश्वास सावरकर १९६९ मध्ये सरोज दोरायस्वामी यांच्याशी विवाहबद्ध झाले. बारा वर्षे महाराष्ट्र राज्यात वनाधिकारी म्हणून काम केल्यावर त्यांना केंद्रीय वन सेवेत पाठविण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या सेवेत असताना त्यांनी दोन वर्षे नाशिक, चार वर्षे पुणे येथेही काम केले. या काळात आणखी एका वरिष्ठ सहकार्‍यांसमवेत त्यांनी मेळघाट जंगलासाठी वन्य जीवन व्यवस्थापनाचा आराखडा तयार केला. मेळघाट हे वाघांसाठी संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले होते. भारतात त्यावेळी ‘वाघ संरक्षित’ तयार होत असलेल्या नऊ वेगवेगळ्या आराखड्यांपैकी हा एक होता. अशा प्रकारचे काम भारतात पहिल्यांदाच होत होते. या त्यांच्या कामाचे केंद्र व राज्य सरकारकडून खूप कौतुक झाले.१९७४-७९ या काळात नंतर त्यांनी अमरावती विभागातील परतवाडा येथील मेळघाट प्रकल्पात पण काम केले. या वेळेस विश्वास सावरकरांना विशेष प्रशिक्षणासाठी डेहराडून येथेही पाठविण्यात आले होते.

शिल्पकार चरित्रकोश ३५९