पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/४५१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

थोरात-पाटील, शंकर पांडुरंग संरक्षण खंड थ थोरात-पाटील, शंकर पांडुरंग भूसेना - लेफ्टनंट जनरल अशोकचक्र, कीर्तिचक्र, पद्मश्री १२ ऑगस्ट १९०६ - १० ऑगस्ट १९९२ शंकर पांडुरंग थोरात-पाटील यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यात शाहूवाडी तालुक्यातील वडगाव येथे झाला. थोरात शेतकरी कुटुंबातील असले तरी त्यांचे वडील डॉ. पांडुरंग चिमणाजी पाटील उच्चविद्याविभूषित होते. शंकर थोरात यांचे शिक्षण पुण्यातील पूना हायस्कूल आणि नूतन मराठी विद्यालयात झाले. १९२३मध्ये ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. १९२४ ते १९२६ दरम्यान इंग्लंडमधील सॅण्डहर्ट येथील रॉयल मिलिटरी कॉलेजमध्ये त्यांचे सैनिकी शिक्षण झाले. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश भारतीय सैन्यात काम करताना शिस्त, संघटना आणि तंत्रज्ञान अशा सर्व गोष्टी थोरात यांनी कष्टपूर्वक आत्मसात केल्या. १९३५मध्ये त्यांच्या पलटणीला जुन्या वायव्य सरहद्द प्रांतात धाडण्यात आले. तेथील खैबर खिंडीच्या भोवतालच्या प्रदेशात पठाणी टोळ्यांशी सतत चकमकी होत असत. येथेच थोरात यांच्या पलटणीचे मुख्य कार्यालय होते. या वेळी झालेल्या सैनिकी कारवाईत थोरात यांच्या कणखर नेतृत्वाखाली पलटणीने पठाणांच्या टोळीचे कंबरडे मोडले. अचूक टेहळणी व मनोधैर्याच्या जोरावर थोरात यांनी ही कामगिरी यशस्वी केली. १९३९मध्ये दुसरे जागतिक महायुद्ध सुरू झाले. सैनिकी अधिकार्‍याने कायमच युद्धाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी धडपड करावी, असे थोरात यांचे मत होते. याचा प्रत्यय दुसर्‍या महायुद्धाच्या रणधुमाळीतही आला. कोहीमाला जपानी सैन्याने घातलेल्या वेढ्यात तीन भारतीय पलटणी अडकलेल्या होत्या. जपान्यांचा वेढा मोडून आपल्या पलटणींची सुटका करण्यासाठी हिंदी सैनिकांनी मोठ्या चकमकींना तोंड दिले. त्यात थोरात यांच्या पलटणीने मोठे कर्तृत्व दाखविले. इंफाळ तर भारतापासून जवळजवळ तुटल्यातच जमा होते. तेथेही थोरात यांनी अतुलनीय कामगिरी बजावून इंफाळ वाचविले. दुसर्‍या महायुद्धात ब्रह्मदेशाच्या आघाडीवर केलेला रणसंग्राम हा युद्धशास्त्रातील एक अजोड इतिहासच मानला जातो. थोरातांनी तेथे अतिशय जिद्दीने विजयश्री खेचून आणली. नेतृत्व, चिकाटी, कणखरपणा आणि उत्कृष्ट डावपेच वापरल्याबद्दल थोरातांना त्या काळी ‘डिस्टिंग्विश्ड सर्व्हिस ऑर्डर’ हे सध्याच्या ‘महावीरचक्रा’च्या दर्जाचे शौर्यपदक बहाल करण्यात आले. भारताची राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी असावी असा निर्णय १९४५मध्ये घेण्यात आला. ही योजना तयार करून कार्यवाही करण्यासाठी थोरात यांना ब्रिगेडियरपदी पदोन्नती देण्यात आली. केवळ थोरात यांच्या प्रयत्नामुळेच ही प्रबोधिनी महाराष्ट्रात पुण्यातील खडकवासला येथे उभी राहिली. देशाची फाळणी झाल्यानंतर थोरात यांनी सीमेवर शांतता प्रस्थापित करण्याचे मोठे कार्य केले. प्रक्षोभक आणि स्फोटक वातावरणाच्या राजधानीत दिल्ली एरिया ४४६ शिल्पकार चरित्रकोश