पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/४७५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बेवूर, गोपाळ गुरूनाथ संरक्षण खंड त्यांना ‘व्हॉइसरॉय- समन्वयक समिती’ने लष्कर सचिव म्हणून घोषित केले. बेवूर हे एकमेव आणि पहिले भारतीय अधिकारी होते, ज्यांना हा बहुमान मिळाला होता. १९४७ मध्ये त्यांनी ‘२ डोग्रा’ची सूत्रे हाती घेतली. बेवूर यांनी अनेक वर्षे शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्राथमिक सैन्यप्रशिक्षणाचे धडे दिले. त्यानंतर १९४८ मध्ये बेवूर यांना राष्ट्रीय छात्र सेना (एन.सी.सी.)चे पहिले मुख्य अधिकारी म्हणून निवडण्यात आले. बेवूर यांचा भारत-पाक आणि भारत-चीन युद्धाच्या वेळेस लष्करात मोलाचा सहभाग होता. फेब्रुवारी १९६१ मध्ये जालंधर येथील सत्ताविसाव्या इन्फन्ट्री डिव्हिजनचे ते मुख्य जनरल कमांडर होते. १९६२ मध्ये चीनच्या आक्रमणाला सुरुवात झाल्यावर त्यांनी डिव्हिजन पश्चिम बंगालमधील कलिमपोंग येथे हलविली. येणार्‍या प्रत्येक संकटाला अथवा आव्हानाला त्यांनी संधी मानून नेहमीच पराक्रम गाजवला. भारत-पाक युद्धाच्या वेळी दक्षिण कमांडचे मुख्य कार्यालय असलेल्या राजस्थान व कच्छ भागातील अनेक मोहिमा त्यांनी यशस्वीरीत्या पार पाडल्या. जैसलमेर येथे तैनात असलेल्या भारतीय सैन्याच्या तुकडीवर हल्ला करण्यासाठी शत्रूने आपले पायदळ आणून उभे केले. हल्ला करून रामगड येथील सैन्याची फळी कमकुवत करण्याचा शत्रूचा मनसुबा होता. पण त्यावेळी बेवूर यांनी ठोस भूमिका घेतली. त्यांच्या प्रेरक नेतृत्वाखाली तसेच हवाई दलाच्या मदतीने भारतीय लष्कराने शत्रूला लोंगोवाल येथेच थोपवून धरले. भारतीय सैन्याने आगेकूच करत शत्रूच्या भागातील बराच मोठा भाग आपल्या ताब्यात घेण्यात यश मिळविले. बेवूर यांच्या दुर्दम्य इच्छाशक्ती आणि प्रबळ आत्मविश्वासाच्या जोरावर भारतीय सैन्याने शत्रूला नामोहरम करण्यात यश मिळवले. बेवूर यांनी भूसेना आणि वायुसेना या दोन्ही विभागातील परस्परसंबंध चांगले जपले आणि वृद्धिंगत केले. याच जोरावर अनेक खडतर मोहिमा यशस्वी केल्या. १९६३ मध्ये त्यांना दिल्ली येथील मुख्य सैन्यदल कचेरीचे सैन्य प्रशिक्षण अधिकारी म्हणून नेमले, त्यांनी १९६४ पर्यंत ही जबाबदारी समर्थपणे पेलली. बेवूर यांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांना परमविशिष्ट सेवा पदकाने गौरविले गेले. १९७१ मध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते ‘पद्मभूषण’ या पुरस्काराने त्यांना सन्मानित केले गेले. राजस्थान व कच्छ भागातील मोहिमा यशस्वी केल्याबद्दल १९७३ मध्ये त्यांनी फिल्ड मार्शल सॅम माणेकशा यांच्यानंतर लष्करप्रमुख (चीफ ऑफ आर्मी स्टाफ) म्हणून जबाबदारी घेतली. १९७६ मध्ये त्यांना भारताचे डेन्मार्क येथील राजदूत होण्याच्या सन्मान मिळाला. त्यापूर्वीच ते १९७५ मध्ये लष्करसेवेतून निवृत्त झाले. डेन्मार्क येथे जवळपास ३ वर्षे त्यांनी भारताचे प्रतिनिधीत्व केले. बेवूर हे २ वर्षे पुणे विद्यापीठाच्या सर्वोच्च नियामक मंडळाचे सदस्य होते. तसेच पुण्यातील किर्लोस्कर उद्योग समूहाच्या नियामक मंडळातही होते. त्यांच्या स्मरणार्थ कोरेगाव पार्क येथील एका रस्त्याला जनरल बेवूर यांचे नाव दिले गेले. - अनघा फासे

  • * *

४७० शिल्पकार चरित्रकोश