पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/५०२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संरक्षण खंड सोमण, भास्कर सदाशिव केली. डफरीनची परीक्षा यशस्विरीत्या उत्तीर्ण झाल्यावर ते १९२९मध्ये डफरीनवर दाखल झाले. डफरीनच्या तीन वर्षांच्या कालावधीत त्यांनी एस.एस. जलवीर या व्यापारी जहाजावर दोन महिने शिल्डिंग अ‍ॅप्रेंटिसशिप केली. १९३२च्या सुमारास रॉयल इंडियन मरीनमध्ये भारतीय तरुणांना प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला. नौसेनेच्या प्रशिक्षणासाठी डार्टमाऊथ येथील अकॅडमीमध्ये डफरीनच्या चार कॅडेट्सकरिता जागा राखून ठेवण्याचा प्रस्ताव मंजूर झाला. त्या वेळी सोमणांनी रॉयल मरीनची प्रवेश परीक्षा देण्याचे ठरवले व ते त्यामध्ये उत्तीर्ण झाले. डफरीनचे प्रशिक्षण पुरे झाल्यावर १४ मार्च १९३२ रोजी ते इंग्लंडला रवाना झाले. इंग्लंडमध्ये त्यांचे सुरुवातीचे प्रशिक्षण एच.एम.एस. इरॅबस या प्रशिक्षण नौकेवर झाले. पुढे पाकिस्तानी नौदलाचे प्रमुख झालेले एच.एम.एस. चौधरी यांच्याशी सोमणांची तेथेच भेट झाली. या प्रशिक्षण नौकेवर असतानाच सोमणांनी नौसेना प्रशिक्षणाबरोबरच वैमानिक होण्याचा परवानाही मिळवला. मिडशिपमन सागरी प्रशिक्षणाकरिता त्यांची एच.एम.एम. व्हर्सटाइल या विनाशिका प्रकारातील जहाजावर नेमणूक झाली. त्यानंतर त्यांना पोर्टस्मथ आणि वेमथ येथील शिक्षण केंद्रांमध्ये विविध प्रकारचे प्रावीण्याचे शिक्षण मिळाले. परदेशातील प्रशिक्षण आटपून ते अडीच वर्षांनी ऑगस्ट १९३४मध्ये भारतात परतले. त्या वेळी त्यांची नेमणूक रॉयल मरीनमध्ये सब-लेफ्टनंट या हुद्द्यावर झाली. भारतात त्यांची प्रथम नियुक्ती कॉर्नवॉलिस या युद्धनौकेवर झाली. तेथे काही काळानंतर ते फर्स्ट लेफ्टनंट झाले. डलहौसी हे प्रशिक्षण जहाज अपुरे पडू लागल्यावर रॉयल मरीनने कराचीजवळच्या मनोरा या बंदराच्या परिसरात एच.एम.आय.एस. बहादूर हे प्रशिक्षण केंद्र स्थापन केले. तेथे सोमण भरती अधिकारी म्हणून दाखल झाले. दुसर्‍या महायुद्धात सुरुवातीला कॉर्नवॉलिस हे जहाज एडनजवळ सागरी पहारा करण्याच्या कामावर होते. त्याच जहाजावर सोमण पुन्हा फर्स्ट लेफ्टनंट म्हणून आले. त्यांच्या तीन वर्षांच्या कॉर्नवॉलिसवरील सेवाकाळात बेरबरा बंदरामध्ये भारतीय सैन्याच्या एका दलाची सुटका आणि एडनजवळच्या समुद्रात तीन इटालियन पाणबुड्यांचा विनाश या प्रमुख घटना घडल्या. युद्धकाळात त्यांच्यावर नाविक दलाकरिता भरती करण्याची जबाबदारी टाकण्यात आली. काही काळानंतर त्यांची खैबर या युद्धनौकेवर कमांडिंग ऑफिसर म्हणून नियुक्ती झाली आणि लेफ्टनंट कमांडर या हुद्द्यावर त्यांची बढती झाली. त्यांनी २३ जुलै १९४२ रोजी खैबरची अधिकारसूत्रे ग्रहण केली. दरम्यानच्या काळात त्यांनी भूसेना व वायुसेना यांच्याबरोबर संयुक्त कारवाईचे प्रशिक्षणही पूर्ण केले. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात अटलांटिक महासागरामध्ये व्यापारी जहाजांना संरक्षण देणार्‍या ‘कॉनव्हॉय एस्कॉर्ट ग्रूप’चे काम खैबरने केले. नंतर खैबरची सूत्रे नव्या कॅप्टनकडे सुपूर्त करून सोमण दि.१ जून १९४३ रोजी ‘आय.एन.एस. हमला’वर दाखल झाले. त्या वेळी मंडपम येथे असलेल्या या नौसेना प्रशिक्षण केंद्रामध्ये भूसेना आणि नौसेना यांच्या संयुक्त कारवाईचे प्रशिक्षण दिले जात असे. आग्नेय आशियातील युद्धक्षेत्रामध्ये या कारवाया करण्याच्या दृष्टीने याची तयारी सुरू होती. पण प्रत्यक्षात ती कारवाई झालीच नाही.

स । शिल्पकार चरित्रकोश ४९७