पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/५१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

। घ। घारपुरे, जनार्दन रघुनाथ न्यायपालिका खंड आणि तर्कशुद्ध विवेचन केले आहे. ते आजही महत्त्वाचे आणि मार्गदर्शक ठरणारे आहे. एवढा प्रचंड लेखनप्रपंच करीत असतानाच घारपुरे यांचा मुंबई उच्च न्यायालयातील वकिलीचा व्यवसायही चालू होता आणि विविध संस्थांशी संबंध आणि त्यांच्या कार्यात भाग घेणेही चालू होते. त्याशिवाय मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, पुण्याच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटी, भारत इतिहास संशोधक मंडळ व भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेशी, वाईच्या प्राज्ञ पाठशाळेशीही त्यांचा घनिष्ठ संबंध होता. मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेचेही ते सदस्य होते. १९३५च्या कायद्यानुसार दिल्ली येथे फेडरल कोर्टाची स्थापना झाल्यावर ते तेथे वकिली करू लागले. ४ मार्च १९२३ रोजी घारपुरे यांनी मुंबई येथे ‘इंडियन लॉ सोसायटी’ या संस्थेची स्थापना केली. मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश सर नारायण गणेश चंदावरकर हे या संस्थेचे पहिले अध्यक्ष, तर घारपुरे हे पहिले सचिव झाले. पुढच्याच वर्षी, म्हणजे १९२४ मध्ये या सोसायटीच्या विद्यमाने पुण्याच्या सुप्रसिद्ध पूना लॉ कॉलेजची स्थापना झाली. घारपुरे या कॉलेजचे पहिले प्राचार्य झाले. त्यामुळेच त्यांचा उल्लेख नेहमी प्रा.घारपुरे असा केला जातो. संस्थेची रीतसर नोंदणी नंतर पुण्याला झाली. आज हे कॉलेज आय.एल.एस. विधि महाविद्यालय म्हणून ओळखले जाते. सोसायटीचे सचिव आणि कॉलेजचे प्राचार्य या दोन्ही नात्यांनी १९२४ ते १९५० या काळात प्रा.घारपुरे यांनी महनीय कामगिरी केली आणि महाविद्यालयाला सार्वत्रिक लौकिक मिळवून दिला. १९२४ मध्ये कायदेशिक्षणात एवढी मोठी गुंतवणूक करणे हे प्रा. घारपुरे यांच्या दूरदृष्टीचे प्रतीक होते. कायदा म्हणजे केवळ नियम नव्हेत, तर समाजाची धारणा आणि सुधारणा करण्याचे ते एक साधन आहे, यावर त्यांची श्रद्धा होती. ‘अभिरूप न्यायालय’ (‘मूट कोर्ट’) हा आज कायदेशिक्षणाचा अविभाज्य भाग समजला जातो. प्रा.घारपुरे यांनी ही अभिनव संकल्पना आय.एल.एस. विधि महाविद्यालयात १९३९ पासून राबविली. प्रा.घारपुरे यांनी लावलेल्या रोपाचा वेलू आज गगनावरीच नव्हे तर गगनापलीकडे गेला आहे. गेल्या शहाऐंशी वर्षांच्या काळात या महाविद्यालयाने देशाला अनेक वकील, न्यायाधीश, न्यायविद आणि नेते दिले आहेत. प्रा.घारपुरे यांचे कार्य त्यांच्यानंतर प्रा.ग.वि.पंडित यांनी आणि नंतर प्रा.डॉ.सत्यरंजन साठे यांनी निष्ठेने पुढे चालविले. त्यामुळेच आज या महाविद्यालयाने राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त केली आहे. स्वातंत्र्यप्राप्तीच्या आगेमागे ‘हिंदू कोड’ तयार करण्यासाठी सरबी.एन.राव यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या ‘हिंदू लॉ कोडिफिकेशन कमिटी’चे प्रा.घारपुरे सदस्य होते. या समितीच्या शिफारसींनुसारच नंतर ‘हिंदू कोड’ची चार स्वतंत्र विधेयके संसदेने १९५५ व १९५६मध्ये संमत केली. महाराष्ट्र विज्ञानवर्धिनी (‘महाराष्ट्र असोसिएशन फॉर द कल्टिवेशन ऑफ सायन्स’) किंवा आजची ‘आघारकर संशोधन संस्था’ या डॉ.आघारकरांच्या संस्थेच्या स्थापनेत प्रा.घारपुरे यांचा सक्रिय सहभाग होता. अनेक वर्षे या संस्थेचे कामकाज आय.एल.एस. विधि महाविद्यालयाच्या आवारातच चालत असे. ज्येष्ठ वकील, धर्मशास्त्रग्रंथमालेचे लेखक-प्रकाशक आणि आय.एल.एस. विधि महाविद्यालयाचे संस्थापक प्राचार्य या तिन्ही नात्यांनी प्रा.घारपुरे यांनी केलेले कार्य नि:संशय चिरस्थायी स्वरूपाचे आहे. - शरच्चंद्र पानसे संदर्भ : १. अर्वाचीन चरित्रकोश २. मराठी विश्वचरित्रकोश

५० शिल्पकार चरित्रकोश