पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/५६०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संरक्षण खंड रेवाणे, बाबू धोंडू दि. २४ ऑक्टोबर रोजी ५०० चिनी सैनिकांच्या तुकडीने त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. आपले सैनिक संख्येने खूपच कमी असूनसुद्धा मेजर रेगे यांच्या नेतृत्वाखालील सैनिकांनी मोठ्या धैर्याने प्रतिकार केला आणि शत्रूचे चार हल्ले परतवून लावले. या युद्धात शत्रुसैन्याची मोठ्या प्रमाणावर हानी झाली. शेवटी हातघाईच्या लढाईत आपल्या तुकडीला माघार घ्यावी लागली. | मेजर रेगे आणि त्यांच्या तुकडीने शत्रूची आगेकूच बराच वेळ रोखून धरून संपर्क मार्ग मोकळा ठेवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. | या मोहिमेदरम्यान मेजर पंढरीनाथ रेगे यांनी अत्युच्च धाडस व नेतृत्वगुणांचे प्रदर्शन घडवले, त्याबद्दल त्यांना दि. २४ ऑक्टोबर १९६२ रोजी वीरचक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रेवाणे, बाबू धोंडू भूसेना - नाईक वीरचक्र । २८ मार्च १९२३ - ६ सप्टेंबर १९४८ | बाबू धोंडू रेवाणे यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील कुर्बळजावळी या गावात झाला. दि. २८ मार्च १९४० रोजी सैन्यात प्रवेश करून त्यांनी मराठा लाइट इन्फन्ट्रीच्या पाचव्या तुकडीत सेवा करण्यास सुरुवात केली. १९४८ च्या लढाईत ६ सप्टेंबर रोजी मुकुंद पुलावर हल्ला करण्यासाठी पुढे सरकणा-या ‘बी’ कंपनीमधील आघाडीच्या पलटणीच्या एका विभागाचे नेतृत्व त्यांच्याकडे होते. लक्ष्याच्या जवळ पोहोचले असताना शत्रूने जोरदार गोळीबाराला सुरुवात केली. हा गोळीबार संपूर्ण दिवस चालू होता व त्यामुळे पांगलेल्या कंपनीचा एकत्रित हल्ला करणे शक्य होत नव्हते. परंतु नाईक रेवाणे यांनी धाडसाने परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. थोड्याच वेळाने त्यांच्या विभागातला ब्रेन मशीनगन चालविणारा गनर जखमी झाला, तेव्हा त्यांनी स्वत: ब्रेन मशीनगनचा ताबा घेतला व अचूक गोळीबार करीत शत्रूचा मोर्चा उद्ध्वस्त केला. स्वत:च्या सुरक्षिततेचा अजिबात विचार न करता नाईक बाबू रेवाणे यांनी आघाडीवर राहून त्यांच्या तुकडीचे नेतृत्व केले. आपल्या तुकडीवर नियंत्रण ठेवतानाच त्यांनी अडीच तास ब्रेनगनचा मारा सुरूच ठेवला. | जेव्हा त्यांच्याकडचा दारूगोळा संपत आला, तेव्हा त्यांनी अधिक दारूगोळा मिळण्यासाठी दुस-या मोर्चापर्यंत सरपटत जाण्याचा प्रयत्न केला. परंतु असे करत असताना त्यांच्या छातीमध्ये शत्रूच्या गोळ्या लागल्या व ते धारातीर्थी पडले. शिल्पकार चरित्रकोश ५५५