पान:शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती (Shetkari Sanghataana Vichar aani Karyapaddhti).pdf/१०३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पावलं पुढं गेलं पाहिजे. आपला प्रगतीचा मार्ग हा काही राजरस्त्यासारखा नाही. (आजचे सगळे राजरस्ते इंडियाच्या प्रगतीच्या दिशेनेच आखलेले आहेत.) आपण आपल्या अडचणींचा सगळा डोंगर दगडाधोंड्यातून वाट काढत चढतो आहोत. डोंगर चढताना जसं सांगता येत नाही की आपण चालतो आहोत तो आपल्याला हवा असलेलाच रस्ता आहे. त्याचप्रमाणे आपल्याला हा डोंगरवाटा शोधत शोधत चढावयाचा आहे. म्हणून आजच्या पद्धतीमध्ये आपण कोणत्या प्रमाणात शासनाला खरेदी करायला भाग पाडू शकतो याचा अंदाज घेऊनच पावलं टाकली पाहिजेत. आपल्याला जे व्हायला हवे ते झटकन पूर्ण होणार नाही. एखाद्या शेतकऱ्याचं आज नुकसान झालं असलं तरी सर्वसाधारण शेतकऱ्याला कांद्याला ६० ते ७५ रु. क्विंटलला भाव मिळाल्यामुळे त्यांची ताकद वाढली आहे. यंदा ज्याचं नुकसान झालं आहे त्याची ताकद पुढच्या वर्षी वाढेल. आपण एका शेतकऱ्याचा, एका व्यक्तीचा विचार करीत नाही. आज एखाद्याचं नुकसान झालं असलं तरी जमिनी मोठ्या प्रमाणावर सुटायला लागल्या आहेत, सोसायट्या फिटू लागल्या आहेत. आणखी दोन तीन वर्षांनी शेतकऱ्यात अशी ताकद येईल की, भाव मिळाल्याखरीज आम्ही मालच देणार नाही असं तो म्हणू लागेल. एखाद्या वेळी त्याच्या लक्षात येईल की आपला माल नाशवंत माल आहे, आपण लढाई देऊ शकत नाही. मग तो ठरवील की आपण या मालाचं पीक घेऊ नये - दुसरा अधिक टिकाऊ माल काढू. आपल्यापुढे आखलेला असा सरळ मार्ग नाही म्हणून कुठे खाच दिसली तर तिथं पकडलं पाहिजे आणि पुढील हालचालीसाठी कुठे खाच दिसते ते शोधायला पाहिजे. हाही पुन्हा डावपेचाचा पवित्रा आहे. तुम्ही जर त्यांनी आखून ठेवलेल्या मार्गानं जाण्याचं ठरवलंत तर आपले विरोधक म्हणतील, 'ठीक आहे, या. आम्ही सगळं बरोबर करू' आणि नेहमीप्रमाणे पुन्हा फसवतील. आता जर तुम्ही मुंबईला गेलात आणि महाराष्ट्र फेडरेशनच्या गोपालकृष्णन् ना भेटलात तर ते म्हणतील, 'आम्ही फार चांगली खरेदी चालवली आहे.' हे असंच सगळे म्हणतील. पण त्यांची वृत्ती फार वेगळी - वाईट आहे. मी अनुभवलेला एक प्रसंग सांगतो. जेव्हा बाजारपेठेत १३२ रु क्विंटलने ज्वारी खरीदण्यासाठी फेडरेशनची माणसं आली नाहीत आणि शेतकऱ्याला ज्वारी ६० ते ७५ रुपयांनी विकावी लागली त्या वेळेस मी मुंबईस महाराष्ट्र फेडरेशनच्या गोपालकृष्णन् ना भेटलो. मी तिथे बसलो होतो आणि ते ज्वारीच्या खरेदीबाबत प्रश्न निर्माण झाला आहे म्हणून टेलीफोनवरून मोठमोठ्या

शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती । १०६