पान:शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती (Shetkari Sanghataana Vichar aani Karyapaddhti).pdf/१०७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

व्यवसाय तोट्यात चालतो याचा प्रदीर्घ अनुभव घेऊन जाणूनबुजून अकार्यक्षम शेती करतो ज्यामुळे जगून वाचून राहण्याची काही तरी शक्यता राहील (Survival technology) ज्या ज्या वस्तूला वाजवी किंमत मिळाली त्या त्या वस्तूचे उत्पादन शेतकऱ्यांनी वाढवल, शेतीचे तंत्रज्ञान आत्मसात केले, नवे तंत्रज्ञान तयार केले अशी स्पष्ट उदाहरणे समोर आहेत. द्राक्षाच्या लागवडीबाबत महाराष्ट्रातील शेतकऱ्यास आज तोड नाही. अपुऱ्या किमती हे अकार्यक्षमतेचे मूळ कारण आहे. रास्त भाव मिळू लागल्याखेरीज उत्पादन खर्च कमी होणार नाहीत. उलट शेती जितकी तोट्यात राहील तितका उत्पादनखर्च वाढेल.
 कार्यक्षमतेच्या आंतरराष्ट्रीय पातळीवर आज या देशांतील कोणताही उत्पादक नाही. याचा अर्थ त्याचा खर्च भरून येऊ नये असे नाही. शेती फायद्याची करणे हाच कार्यक्षमता वाढविण्याचा मार्ग आहे. एकूण शेतीच्या सर्व दुःखांचे मूळ आर्थिक आहे; शेती मालाला भाव मिळू न देण्याच्या शासकीय नीतीत आहे अनुदानांनी किंवा कार्यक्षमता वाढवण्याच्या तुटपुंज्या मलमपट्ट्यांनी हा रोग दूर होणारही नाही.

 ■ ■

शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती । ११०