पान:शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती (Shetkari Sanghataana Vichar aani Karyapaddhti).pdf/१०८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 प्रकरण : १०
 एक कलमी मागणीचे अर्थशास्त्रीय परिणाम



 शेतकरी संघटनेचा कार्यक्रम हा केवळ शेतकऱ्यांसाठी नसून एकूणच देशातील दारिद्र्य दूर करण्याचा कार्यक्रम आहे असं आपण सुरुवातीपासून मांडतो आहोत. शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळू लागला म्हणजे शेतकऱ्याचं दारिद्र्य दूर होईल. पण यामधून सगळ्या देशाचं दारिद्र्य कसे काय दूर होईल? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी शेतीमालाला भाव मिळाला म्हणजे त्याचे काय काय परिणाम होतील याचा थोडा अभ्यास केला पाहिजे. हे परिणाम तीन टप्यांत काय काय होणार आहेत हे पाहणार आहोत. त्यातला पहिला टप्पा अल्पमुदतीचा म्हणजे भाव मिळाल्यानंतरचा साधारण वर्षभराचा आहे, दुसरा टप्पा भाव मिळाल्यानंतरच्या दीर्घ मुदतीचा-साधारण दोन तीन वर्षांचा म्हणजे मध्यम मुदतीचा, तर तिसरा दीर्घ मुदतीचा - साधारण तीन ते पाच वर्षांच्या मुदतीचा धरू या.
 यामधील अल्पमुदतीच्या परिणामांचा आपल्याला थोडाफार अनुभव आलेला आहे. पुणे अणि नासिक जिल्ह्यांमध्ये ऊस आणि कांद्याला भाव मिळाल्यावर काय काय परिणाम झाले? शेतकऱ्याच्या हाती पैसा आल्यावर त्यानं खाजगी गहाणवटीच्या जमिनी सोडवून घेतल्या. ग्रामीण भागात असं दिसून येतं की लग्न, दशपिंड वगैरे निमित्ताने घेतलेल्या फार थोड्या रकमेवर फार मोठी जमीन गहाणवट म्हणून अडकून पडलेली असते. तेव्हा प्रथमतः या गहाणवट जमिनी सोडवून घेतल्या जातात. अर्थात् या जमिनी गावातल्या बड्या, पुढारी मंडळींनी काही हिशेब मनाशी ठेवून घेतलेल्या असतात, त्या सुटल्यावर त्या मंडळीचा आपल्यावर थोडा रोष होतो.

 दुसरा अल्पमुदतीचा परिणाम जो आहे त्याबद्दल आपण काळजी घ्यायला

शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती । १११