पान:शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती (Shetkari Sanghataana Vichar aani Karyapaddhti).pdf/११०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सोसायट्यांची पीक-कर्जे फेडून टाकली. आज सगळ्या सोसायट्यांची सगळी कर्ज फिटलीत. कुणावर सोसायटीचं कर्जच राहिलं नाही.
 आणखी एक परिणाम दिसून येतो तो म्हणजे आजवर पैसा नसल्यामुळे कधी करायला मिळाल्या नाहीत अशा चैनमौजा करण्याची प्रवृत्ती पैसा हाती आल्यावर दिसून आली. अर्थात् चैनमौज या शब्दाचा अर्थ शेतकऱ्याच्या आजच्या जीवनमानाच्या मानाने मर्यादित आहे. यावेळी कारभारणीला शेतकऱ्यानं १०० रुपयांचं एक लुगडं आणलं तर ती आपण चैन धरू या. शहरामध्ये कारकुनी करणाऱ्या माणसाच्या बायकोलासुद्धा आज एका वेळी १० ते १२ साड्या असतात; हे लक्षात घेतलं तर की काय मोठी चैन आहे असं म्हणण्याचं कारण नाही. हौसमौज करणं ही प्रवृत्ती शेतकऱ्यात निर्माण झाली तर चांगलंच होईल. याच्यापुढे शेतकऱ्याला मनात कुठतरी उत्साहानं जगावं असं वाटलं, चांगल्या गोष्टींचा उपयोग घ्यावा, कुटुंबातली आपली जी मुलंमाणसं आहेत त्यांच्यासाठी काहीतरी चांगलचुंगल आणावं अशी वृत्ती त्याच्यात वाढली की त्याची उत्पादनक्षमता वाढेल, त्याच्यात महत्त्वाकांक्षा, जाणीव निर्माण होईल आणि संघटनेची ताकद वाढेल.
 प्रत्यक्षात वाढलेले भाव हातात पडण्यापूर्वीच शेतमजुराच्या मजुरीचे दर वाढले आहेत.
 हे झाले अल्पमुदतीत दिसून आलेले परिणाम.<br   मध्यम मुदतीचे परिणाम : हाती पैसा आल्यावर शेतकरी आपल्या जमिनीत सुधारणा करू शकेल. कुणाला विहीर बांधायची जरूरी असेल तर ती त्याला बांधता येईल, बांधबदिस्ती मजबूत करून घेऊ शकेल. अशा प्रकारच्या कामात तो आपला पैसा वापरू शकेल. आज ज्वारी करणाऱ्याला भुईमूग काढता येत नाही कारण त्याला बियाण्याचा खर्च परवडत नाही; किंवा भुईमूग घेणाराला बटाट्याचे पीक घेता येत नाही कारण त्याला बियाण्याचा खर्च झेपत नाही. पण पैसा हाती आला म्हणजे जी पिकं मोठे शेतकरीच घेऊ शकतात अशी कल्पना असते त्या पिकांकडे शेतकऱ्याला वळता येईल.
 त्याचप्रमाणे शेतकऱ्याला लहान लहान का होईना साठवणुकीची व्यवस्था करून मालाला संरक्षण देता येईल असे प्रयोग कोरियात झाले आहेत.

 दीर्घ मुदतीमध्ये अत्यंत महत्त्वाचे परिणाम होतात. शेतीतून मिळणार फायदा पुरेसा नाही. त्यामुळं याच्या पलीकडे कुठंतरी पाऊल पाहिजे असं शेतकऱ्याला

शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती । ११३