पान:शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती (Shetkari Sanghataana Vichar aani Karyapaddhti).pdf/१११

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वाटू लागतं. साठवणुकीची व्यवस्था केल्यामुळे मालाला चांगला भाव - हंगामातला भाव न मिळता तुटवड्याचा मिळू लागला तरी फायदा पुरेसा नाही म्हणून काही तरी उद्योगधंदे सुरू करण्यामागे शेतकरी लागले. ग्रामीण भागात लहान लहान का होईनात, उद्योगधंदे सुरू होतील. कुणी पिठाची गिरणी घालेल, कुणी नुसती मिरची विकण्याऐवजी मिरचीची भुकटी करून ती प्लास्टिकच्या पिशवीत भरून बाजारात आणेल, नुसतेच शेंगदाणे विकण्याऐवजी कुणी तेलाची नवीन यांत्रिक घाणी घेईल, कुणी निदान खारे दाणे करून विकेल. अशा तऱ्हेचे छोटे छोटे उद्योगधंदे ग्रामीण भागात सुरू होतील. हा मालाला भाव मिळाल्यामुळे होणारा दीर्घ मुदतीचा एक मोठा परिणाम आहे.
 या सगळ्या परिणामाचा नीट अभ्यास केला तर आपल्याला असं लक्षात येईल की, ग्रामीण भागात पुरेसा रोजगार नसल्यामुळे जे दारिद्र्य आपल्या देशात निर्माण झालेले आहे ते वेगाने दूर होईल.
 आजपर्यंत अशा तऱ्हेचे उद्योगधंदे चालू होऊन रोजगार उपलब्ध व्हायला हवेत हे सगळेजण मान्य करीत होते. पण असे उद्योगधंदे चालू करण्यासाठी जी योजना आखण्यात आली तिच्याप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यासंबंधी कचेऱ्या सुरू करण्यात आल्या. पण शेतकऱ्यांकडे भांडवलच नसल्यामुळे तो काही उद्योगधंदे सुरू करू शकला नाही. शाळा-कॉलेजात शिकून इंजिनियर वगैरे झालेली मुलं त्यांच्या हाती थोडंफार भांडवल दिलं तर ग्रामीण भागात जाऊन कारखाने, उद्योगधंदे सुरू करतील अशी सरकारची कल्पना होती. पण प्रत्यक्षात असं काहीच झालं नाही. मुळात ग्रामीण भागात जर कारखानदारी व्हायची असेल तर ती ग्रामीण जीवनात रूळलेल्या, वसलेल्या माणसाकडनंच होईल. त्यामुळे ग्रामीण भागात उद्योगधंदे, रोजगार सुरू करण्याचा एकमेव उपाय म्हणजे ग्रामीण भागात राहणाऱ्या मंडळीच्या हाती भांडवल खेळते ठेवणे हा आहे. त्यासाठी त्यांचे आता चालू असलेले शोषण थांबवून त्यांच्या मालाला योग्य भाव देणे आवश्यक आहे.

 ■ ■

शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती । ११४