पान:शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती (Shetkari Sanghataana Vichar aani Karyapaddhti).pdf/११२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 प्रकरण : ११
 संघटनेची मागणी आणि ग्राहक


 शेतीमालाला रास्त भाव देण्याच्या नीतीमुळे उत्पादन व रोजगार याजवर विपरीत परिणाम घडून येतात. देशातील भयानक दारिद्र्य हे या नीतीचाच परिणाम आहे. शेतीमालाला योग्य भाव मिळाले तर हे दुष्पपरिणाम दूर होतील व गरिबी हटेल. देशाचा अंतर्गत रोग दूर झाल्यामुळे देश निसर्गसुलभतेने विकासाच्या पायऱ्या गाठील हे आपण पाहिले.
 तरीही 'शेतीमालाला रास्त भाव' या मागणीला काही मंडळींचा प्रखर विरोध असतो. ही मंडळी मुख्यतः शहरी सुखवस्तू वा मध्यम वर्गातली असतात; विविध व्यवसायातली पण मुखतः नोकरी पेशाची असतात. शेतकरी संघटनेच्या विचारावर त्यांचे अनेक आक्षेप असतात. त्यातील प्रमुख दोन पुढीलप्रमाणे आहेत.
 १) शेतीमालाला भाव वाढवून दिले तर कच्च्या मालाचे दर वाढतील. परिणामतः कारखानदारी मालाचे भाव वाढतील. त्यामुळे उत्पानखर्च वाढल्याने शेतीमालाचे भाव पुन्हा वाढवून द्यावे लागतील. हे असे दुष्टचक्र चालू झाले तर भयानक चलनवाढ होईल.
 २) शेतीमालाला भाव वाढवून दिले तर ग्राहकाला द्याव्या लागणाऱ्या किमतीही वाढतील. मध्यमवर्गीय ग्राहक आधीच कठीण ओढाताणीत सापडलेला असतो. खाद्यपदार्थांचे भाव वाढल्यास त्याला जगणेच अशक्य होईल.
 या आक्षेपांचा आता बारकाईने विचार करू.

 पहिला आक्षेप चलनवाढीसंबंधीचा. क्षणभर असं समजू या की हा आक्षेप तर्कशुद्ध आहे, योग्य आहे. म्हणजे असं मानू या की शेतीमालाचे भाव वाढल्याने चलनवाढ होणार आहे, तरीसुद्धा शेतीमालाला रास्त भाव मिळू नयेत-त्याचा उत्पादनखर्च भरून येऊ नये किंवा शेतकरी तोट्यातच राहिला पाहिजे असा निष्कर्ष त्यातून काढता येणार नाही.

शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती । ११५