पान:शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती (Shetkari Sanghataana Vichar aani Karyapaddhti).pdf/११७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



 प्रकरण : १२
 संघटनेचे सध्याचे स्वरूप


 आपल्याला शेकऱ्यांची संघटना निर्माण करायची आहे. अशी संघटना निर्माण करताना आपल्याला अनेक अडचणींना तोंड द्यावं लागणार आहे.
 गेल्या वर्षभरातील यश आणि अपयश यांच्या अनुभवावरून असं दिसून येतं की, आपली सगळ्यात मोठी अडचण म्हणजे आपण ग्रामीण भागात काम करतो आहोत. वेगवेगळ्या खेड्यांतील अंतर खूप मोठी आहेत. अनेक खेड्यांमध्ये पावसाळ्याच्या ६/७ महिन्यांत जाताही येत नाही अशी परिस्थिती आहे. एखाद्या जिल्ह्यापुरत जर शिबिर घ्यायचं ठरवलं तरी सगळ्या गावांतून निरोप द्यायचा म्हणजे केवढं प्रचंड काम आहे! त्या दृष्टीनं कामगारांची संघटना बांधणं ही सोपी गोष्ट आहे. कारखान्याच्या गेटसमोर एकेका पाळीच्या सुटण्याच्या वेळी एकदा मिटिंग घेतली की सगळ्यांना निरोप कळतो. लगेच सगळे कामगार तुमच्या बाजूला येतील असं नाही; पण निदान निरोपाचं तरी काम होतं. पण निरोप जाणं हीच मुळात शेतकरी संघटनेच्या बाबतीत कठीण गोष्ट आहे.

 एखाद्या गावात गेल्यावर त्या गावातील मंडळींना एकत्र आणण्याचे काम होईल किंवा नाही याची शाश्वती नसते. दोन शेजारच्या गावात भांडण आहेत, या गावची माणसं आली तर त्या गावची येत नाहीत, गावातली या घरची आली तर त्या घरची येत नाहीत, गावातली आली तर वाड्यातली येत नाहीत आणि वाड्यातली आली तर गावातील येत नाहीत असे अनेक प्रकारचे वादविवाद ग्रामीण भागात इतके आहेत की, त्या सगळ्या शेतकऱ्यांना एकत्र आणणे ही गोष्ट कठीण आहे आणि सगळे फरक आणखी ठळक करण्याकरता राजकीय पक्षांनी आता प्रत्येक गावात आणखी फटी पाडून ठेवल्या आहेत. अमुक एक मनुष्य-समजा पाटील अमुक एका पक्षाच्या माणसाबरोबर गेला की सरपंच आणि त्याची माणसं नेमकी उलट्या बाजूला जाणार. हे वाद इतके विकोपाला नेऊन राखले आहेत की एखाद्या गावात जाऊन तुम्ही एखाद्या माणसाला भेटलात आणि तो जर म्हणाला की मी

शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती । १२०