पान:शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती (Shetkari Sanghataana Vichar aani Karyapaddhti).pdf/११८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शेतकरी संघटनेच्या विरुद्ध आहे, तर लगेच दुसरे येऊन म्हणणार आम्ही शेतकरी संघटनेच्या बाजूचे आहोत. गावागावामधील भांडण, वादविवाद, शेतकऱ्याशेकऱ्यातील फरक-उसाचा शेतकरी,शाळूचा शेतकरी, बागायती शेतकरी, मळेवाला, हरभऱ्याचा शेतकरी असे फरक, धर्माचे फरक आहेत, जातीचे फरक आहेत, पक्षांचे फरक आहेत. असे एकेका गावामध्ये शेतकऱ्यांचे हे वादविवाद त्यांना एकत्र आणण्यातील अडचणी आहेत.
 एखाद्या गावात जाऊन तुम्ही बसलात आणि शेतकरी संघटनेच्या प्रचाराला सुरुवात केलीत तर तुमच्या असं लक्षात येईल की, काही विशिष्ट गटाचीच मंडळी आल्याचे तुम्हाला दिसेल. हा आला म्हणून तो येत नाही अशी परिस्थिती असल्यामुळे तुम्हाला दोघांना वेगळ वेगळ भेटावं लागेल - त्यांना सांभाळून आणावं लागेल. तरीसुद्धा बैठकीला बसल्यावर ज्या त्या शेतकऱ्याच्या विचाराची पद्धत अशी असते की, आपली जी वैयक्तिक अडचण आहे ती या शेतकरी संघटनेकडून सोडवून घ्यावी. मग कुणाला आपली मामलेदार ऑफिसमध्ये अडकून पडलेली केस सोडवून घ्यावीशी वाटते, तर कुणी आपल्या गावाला लिफ्ट योजना मिळवावी असं म्हणतो. कारण त्याखाली त्याची आणि आणखी ५/१० जणांची जमीन भिजते-बाकी लोकांना नाही का पाणी मिळेना! कुणी वीज मिळत नाही म्हणून तक्रार करतो. ज्याला त्याला असं वाटतं की आता शेतकऱ्यांचं वेगळं काही करू म्हणतायत तर आपण यातनं आपला व्यक्तिगत प्रश्न सोडवून घेता येतो का बघू या. अशी फक्त स्वतःपुरतं पाहण्याची दृष्टी आज शेतकऱ्यांत आहे. याचं कारण शेतकऱ्यांना आज सर्वसाधारणपणे आपल्याला काही हक्काने मागून मिळेल, आपण ताठ मानेने जगू शकू अशी आशाच उरलेली नाही. कुणी जर गावात आलं तर याच्याकडून काही भीक मिळते का, कुठे कर्जाची सोय होते का, काही धर्मदाय मिळतं का, त्यामुळे आजचा दिवस निभून उद्याचा बघायला मिळतो का इतक्या लाचारीच्या पायरीला शेतकरी गेलेला आहे.
 वेगवेगळी गावे लांबलांब अंतरावर आहेत. शेतकऱ्यांच्यात पराकोटीचे वादविवाद आहेत, आपल्या नशिबातच काही नाही तेव्हा कुठं याचना करून आपलं तरी भलं करता येतं का ते पाहू अशी शेतकऱ्यावर लादली गेलेली लाचार वृत्ती या अडचणींवर मात करून संघटना कशी बांधता येईल यावर खूप विचार करायला हवा.

 गावे लांब लांब अंतरावर असल्यामुळे निर्माण होणाऱ्या अडचणीतून मार्ग

शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती । १२१