पान:शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती (Shetkari Sanghataana Vichar aani Karyapaddhti).pdf/११९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

काढण्यासाठी आम्ही वेगळे वेगळे उपाय योजून पाहिले. अर्थात सगळीकडे सारखेच उपाय योजता येतील असे नाही. प्रत्येक भागात त्या भागातील परिस्थिती पाहून उपाय अमलात आणावे लागतील.

 आपण संघटना करताना जिल्हा किंवा तालुका अशा पातळीवर करता कामा नये. रेव्हेन्यू खात्याच्या ज्या हद्दी आहेत त्या आणि शेतकरी संघटनेची व्यवस्था यांचा काहीही संबंध नाही. आपण शेतीमालाच्या भावाकरता प्रयत्न करतो आहोत तेव्हा आपलं केंद्रस्थान त्या मालाची बाजारपेठ असली पाहिजे. आजूबाजूच्या वेगवेगळ्या गावाची मंडळी त्या ठिकाणी आठवड्यातून एकदा-दोनदा येतात. आपली जी काय कार्यकर्ती मंडळी असतील ती बाजाराच्या दिवशी बाजाराच्या आसपास असायला हवी. नाही म्हटलं तरी जाणाऱ्या येणाऱ्या मंडळींचा तिथं संपर्क होतो आणि निरोप पाठवता येतो. आम्ही चाकणला एक प्रयोग करून बघितला. बाजाराच्या जवळ शेतकरी संघटनेचं नावाला का होईना एक छोटसं कार्यालय काढलं आणि सगळीकडे निरोप पाठविले की, प्रत्येक गावाच्या माणसानं बाजाराला आल्या आल्या इथं डोकावून जायचं. पण त्याचा उपयोग फार मर्यादित झाला. कारण येणारी मंडळी धावत पळत येतात आणि मग त्यांनी घेतलेला निरोप नेहमीच पोचतो असं होत नाही. मग कळवलं की, 'बाजार संपल्यावर इथं येऊन अर्धा पाऊण तास बसत जा.' हाही प्रयोग यशस्वी झाला नाही. याचा फारसा परिणाम दिसून न आल्यामुळे आम्ही बाजारच्या दिवशी निघणारं छोटंसं साप्ताहिक काढलं आणि सबंध तालुक्यामधील प्रत्येक गावात, मग तेथे कुणी वर्गणीदार असो, नसो त्याच्या एक दोन प्रती गेल्याच पाहिजेत अशी व्यवस्था केली. या प्रती आम्ही गावागावांत जाऊन दोन तीन तरुण मंडळी निवडून त्यांच्या नावे पाठवायला सुरुवात केली आणि त्यांच्यावर अशी जबाबदारी टाकली की, हे साप्ताहिक आल्यानंतर गावातल्या सगळ्या मंडळींना एकत्र करून संपूर्ण वाचून दाखवायचं. कारण गावात वाचना न येणारी मंडळीच जास्त. साप्ताहिकातील माहिती वाचून समजावून दिली पाहिजे आणि एखादी गोष्ट समजावून देणं जमलं नाही तर ती आपल्याला समजली नाही असं लिहून कळवलं पाहिजे अशी त्यांच्यावर जबाबदारी टाकली. याचा उपयोग चांगल्या तऱ्हेने होऊ लागला. या साप्ताहिकाचा दुसरा एक चांगला परिणाम झाला. गावच्या शेतकऱ्यांना ज्या अनेक अडचणी येतात - सरकारी अधिकारी त्रास देतो किंवा व्यापारी त्रास देतो अशासारख्या ज्या अडचणी येतात

शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती । १२२