पान:शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती (Shetkari Sanghataana Vichar aani Karyapaddhti).pdf/१२१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

संघटनेविषयी एक शंका निर्माण होते आणि सध्या शेतकरी संघटनेचा प्रसार ज्या गतीनं होतो आहे हे पाहून त्यांना फारच भीती वाटते की, आपल्या तोंडचा घास काढून घेतायत की काय किंवा आपल्या तोंडातील हाडूक काढून घेतात की काय? आपली शेतकरी संघटना म्हणजे राजमार्गाने चाललेला हत्ती आहे. आजूबाजूच्या कुणालाही हे आपलं हाडूक घेऊन जातायत की काय अशी भीती पडण्याचे कारण नाही. आपली पक्षाविषयीची भूमिका स्पष्ट आहे. शेतीमालाला भाव मिळण्याबाबत सर्व पक्षांचं धोरण सारखंच आहे- शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळता कामा नये असं आहे. त्यामुळे त्यांच्यातून चांगली वाईट निवड करायला कुठे वाव नाही. पण म्हणून काही पक्षांच्या सगळ्याच लोकांना आपण दूर फेकायचे नाहीत. आपण संघटना करायला निघालो आहोत. तुमच्या असं लक्षात येईल की, प्रत्येक गावामध्ये चांगली चांगली माणसं उत्साहाच्या भरात पण खऱ्या कळकळीनं, सदिच्छेनं, कोणत्या ना कोणत्या पक्षाचं काम करायला लागली आहेत- कोणत्या ना कोणत्या पक्षात गेलेली आहेत. तिथं गेल्यावर त्यांच्या मनात जाणीव झालेली आहे की, आपण करायला गेलो एक आणि भलतंच काहीतरी निवडणुकीचा प्रचार करत बसलो आहोत; आपल्याला जे काही साधायच होतं, समाजाचं कल्याण करायचं होतं ते काही यातनं होत नाही. शेतकऱ्यांचं काही भलं होत नाही हे त्याला कुठतरी खुपतं. पण आता ही मंडळी कुठंतरी सरपंच, सभापती किंवा आमदार होता येईल अशा कसल्यातरी स्वप्नात अडकली आहेत. म्हणजे चांगल्या हेतूनं निघाले देवाच्या आळंदीला आणि येऊन पोहोचले चोराच्या आळंदीला अशी त्यांची गत झालेली आहे. ही मंडळी आपल्याला तोडून चालणार नाही. आपल्या कामाला ती लावायची आणि आपण त्यांच्याबद्दल एक धोरण ठेवलं पाहिजे की- तू कोणत्या पक्षाचा? - इंदिरा पक्षाचा काय? ठीक आहे. तुझा काय वीस कलमी कार्यक्रम आहे का? फार छान. आमच्या या एका कलमापुरता तू आमच्याबरोबर राहा. मग तुझी जी काय बाकीची कलमं असतील ती तू, तुझा पक्ष आणि निवडणुका बघून घ्या. आम्ही काय तुमच्याविरुद्ध निवडणुका लढवायला येणार नाही किंवा डाव्या आघाडीचा कुणी असला तर- तुझा काय चाळीस कलमी कार्यक्रम ना? ठीक. आमच्या एका कलमापुरता तुझा पक्ष बाजूला ठेव; मग तुझी ती कलमं, पक्ष आणि निवडणुका तुझं तू पाहून घे, आम्ही त्यात ढवळाढवळ करायला येणार नाही.

  नासिक जिल्ह्यामध्ये दोन लाख शेतकरी उभे राहिले. त्यात वेगवेगळ्या पक्षांच्या

शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती । १२४