पान:शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती (Shetkari Sanghataana Vichar aani Karyapaddhti).pdf/१२२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बाजूचे लोक आहेत. माझ्या अगदी जवळच्या सहकाऱ्यांमध्येसुद्धा इंदिरा काँग्रेस, अरस काँग्रेस, जनता, डावे उजवे कम्युनिस्ट, भाजप अशा सर्व पक्षांची मंडळी कमी अधिक प्रमाणात आहेत; लक्ष्मण पगारसारखा नक्षलवादीसुद्धा आहे. या सगळ्या लोकांनी कबूल केलं आहे की, शेतीमालाला भाव मिळविण्याच्या प्रश्नाबाबत आम्ही शेतकरी संघटनेच्याच बाजूचे राहू. त्या आमचे पक्षभेद आड येऊ देणार नाही. या पद्धतीने आपल्याला कार्यकर्ते गोळा करायला हवेत.
 संघटना बांधत असताना दुसरी महत्त्वाची गोष्ट आपल्याला अशी करायला पाहिजे की, कोणत्याही गावामध्ये गेल्यानंतर जितक्या लवकर जमेल तितक्या लवकर गावातील शेतकरी स्त्रियांमध्ये आपल्या विचाराचा प्रसार होण्याची व्यवस्था करणे. यासाठी स्त्री-कार्यकर्त्या तयार करायला पाहिजेत. आपलं आंदोलन जर गावात खऱ्या अर्थानं पसरायचं असेल तर ते शेतकरी स्त्रियांपर्यंत पोहोचल्याखेरीज पसरायचं नाही. आज नासिक जिल्ह्यात संघटना अशा प्रकारे स्त्रियांपर्यंत पोहोचली आहे. नासिक जिल्ह्यात एखाद्या खेडेगावात गेलो की गावातल्या सगळ्या स्त्रिया हातातलं काम टाकून येतात. हे जेव्हा घडतं तेव्हाच खरी जागृती होते. आजपर्यंत राजकीय प्रचाराची पद्धत अशी राहिली आहे की कुणी पुढारी गावात आला की बायका आधी घरात पळून जातात आणि दारं लावून घेतात. मग कुणी तरी दोन माणसं पकडून त्यांना लोकं जमा करून आणायला पिटाळायचं. मग जी काय सभा असेल ती व्हायची. संतमार्गाच्या वेळी किंवा भक्तिमार्गाच्या वेळी ज्याप्रकारे गावातील शेतकरी आणि त्याच्या घरची मंडळी निर्भयपणे कोणतीही शंका मनात न बाळगता एकत्र जमतात त्याच पद्धतीनं आज नासिक, धुळे भागांत लोक शेतकरी संघटनेच्या कामासाठी एकत्र येऊ लागले आहेत. याचा अर्थ असा की आता शेतकरी संघटना मोडली जाऊ शकणार नाही.
 संघटना बांधत असताना एखाद्या गावामध्ये चुकून जरी तुम्ही एखाद्या गटाच्या माणसाचा हात धरून गेलात तरीसुद्धा लवकरात लवकर दुसऱ्या गटाच्या माणसांशी संपर्क साधून तुम्ही काही त्या गटाकरताच आलेले नाही याची खात्री पटवून दिली पाहिजे. हे जर लवकरात लवकर केले नाही तर गावातले निम्मे लोक आपोआपच तुमच्या विरुद्ध जातील. हे अजिबात होता कामा नये.

 गावामध्ये जो वाडा-हरिजनवाडा असतो- आम्ही त्याला राजवाडा म्हणतो- तेथील मंडळी, आजूबाजूला काही आदिवासी मंडळी असतील तर ती मंडळी

शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती । १२५