पान:शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती (Shetkari Sanghataana Vichar aani Karyapaddhti).pdf/१२५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अपेक्षा ज्या आपल्याला पुऱ्या करता येणार नाहीत त्या आपण हातात घेणार नाही. उत्तरेतल्या सगळ्या राज्यांनी शेतकरी संघटना करण्याचे ठरवले आहे, तिकडे हैदराबादला दक्षिणेतल्या राज्यांनी अशीच संघटना बांधण्याचे ठरवले आहे. ते म्हणातात, 'तुम्ही येऊन हे काम करा.' मी म्हटलं, 'माझ्या हातनं व्हायचं नाही.' आमचं अजून आमच्या राज्यात पूर्ण काम नाही. कुठेतरी तीन साडेतीन जिल्ह्यांत सगळं मिळून काम आणि निघाले अखिल भारतीय संघटना बांधायला! असल्या खोट्या फळ्यांना आणि खोट्या नाळ्यांना काही अर्थ नाही. ज्या दिवशी आवश्यक वाटलं तर बिहारमधील आंदोलनालासुद्धा महाराष्ट्रातला शेतकरी तयार होईल तेव्हा खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील संघटना तयार झाली असं म्हणता येईल तरीसुद्धा आपल्या आंदोलनामुळे देशात जे वातावरण निर्माण झाले आहे त्याचा फायदा आपण काही प्रमाणात घेतला पाहिजे. काही प्रमाणात जर आपण लोकांपर्यंत पोहोचलो नाही तर काही दिंडीकर आणि मेळावेकर त्याचा फायदा उठवून लोकांना पुन्हा चुकीच्या रस्त्याला पोहोचवतील. त्यामुळे काही एका प्रमाणात आपल्याला लोकांपर्यंत पोहोचायलाच पाहिजे - आणि त्यासाठी आपल्याला तितकी ताकद निर्माण करायला हवी.
 आज पाचपंचवीस माणसांच्या व्यक्तिगत धावपळीवर ही संघटना उभी राहते आहे. ही माणसं घरचं जवळ-जवळ सगळं सोडून फकीर होऊन फिरतायत. संघनेच्या प्रसाराच्या या वेगात त्यांच्यावरील हा ताण असह्य होईल. त्यासाठी लवकरात लवकर काही उपाय योजना हातात घेतल्या पाहिजेत. उदाहरणार्थ, सगळीकडे निरोप पाहिजे. दैनिक जर काढलं तर हा भार पुष्कळशा प्रमाणात कमी होईल. पण दैनिक काढायचं म्हटलं की संघटनेची यंत्रणा आलीच. एक कुणीतरी संपादक नेमावा लागेल, गावोगावी बातमीदार तरी नेमायला हवेत. त्याला पगार जरी देता आला नाही तरी 'तुमच्याकडून बातम्या येऊ द्या' असं तरी त्याला सांगायला पाहिजे ना? म्हणजे तिथं एक लहानशी संघटना उभी राहिली पाहिजे.

 मी अंबाजोगाईला शिबिरात चर्चा करीत बसलो होतो. नासिकमध्ये नुकतंच मोठ आंदोलन होऊन गेलं होतं. चर्चा करीत असताना एकीकडे माझ्या मनात विचार येत होते, 'मी इथं कालपासून बसलो आहे, नासिकमध्ये पुष्कळ मोठं आंदोलन झालं, तिथल्या लोकांनी पुष्कळ सहन केलं, त्याच्या नंतर उसाला भाव मिळाला, कांद्याची खरेदी चालू झाली. तिथल्या मंडळींचा चार दिवसांनी मेळावा

शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती । १२८