पान:शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती (Shetkari Sanghataana Vichar aani Karyapaddhti).pdf/१२६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आहे. मी इथे बसलो आहे पण ती मंडळी मेळावा यशस्वीपणे पार पाडू शकतील की नाही अशी मला चिंता वाटत राहिली - चांगला अभ्यास केलेल्या विद्यार्थ्यालासुद्धा परीक्षेच्या आधी जशी चिंता वाटते तशी. काही तरी पत्राच्या स्वरूपानं नियमितपणे मला बातम्या पोहोचतील अशी व्यवस्था झाली नाही तर मग आंदोलन मोठ्या प्रमाणात उभं राहू शकणार नाही. मी आज निपाणीकडे गेलो तर विदर्भात काय चाललंय मला कळत नाही. नासिककडे काय चाललंय, मराठवाड्यात नियमित व्यवस्था करायला पाहिजे. त्यासाठी माणसं तावून सुलाखून निवडायला हवीत.
 आज नासिक भागामध्ये आंदोलन होऊन गेल्यामुळे लोकांची परीक्षा झाली आहे. आम्ही शेतकरी संघटनेच्या बरोबर आहोत असं म्हणणारी काही मंडळी अटक करून घ्यायची वेळ आली तेव्हा पार उसात जाऊन लपली असाही अनुभव आला. पण त्याच्या पलीकडे एकेका गावात कुणीकुणी काय काय धावपळ केली आहे हे काही आता कुठं लपून राहणार नाही. तिथल्या गावामध्ये आता काही अशी परिस्थिती राहिलेली नाही की 'शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता कोण' असं विचारलं तर गावचा नेहमीचाच म्होरक्या दाखवतील. त्यामुळे नासिक भागात समिती करण्यासारखी स्थिती निर्माण झाली असे वाटते, तरी अजून निश्चित निर्णय घेतलेला नाही. पण आज जर तुम्ही इथं तशी कार्यकारिणी करतो म्हटलं तर ते चुकीचं होईल. आंदोलनाचा खूप अनुभव असला तरी शेतकरी संघटनेचे आंदोलन झालेले नाही, अशा भागात हा विचार पुढे ढकलला पाहिजे.

 ज्यावेळी लोक म्हणतात काहीतरी घटना करायला हवी, पदाधिकारी नेमायला पाहिजेत त्यावेळी ती ठाम नकार देतो त्याला आणखी एक कारण आहे. आपण जर समित्या करायला सुरुवात केली तर ठिकठिकाणी आपल्या विचारसरणीशी संबंधित नसलेली, तिचा अभ्यास नसलेली माणसं आपली आपली शेतकरी संघटना स्थापन करू लागतील असा धोका आहे. नासिकच्या आंदोलनाचे विचार चालू झाल्यानंतर अनेकांनी आपल्या आपल्या संघटना तयार केल्या - आम्हाला त्याचा पत्ताच नाही. अशीच अहमदनगर जिल्ह्यातल्या माणसानं संघटना तयार केली आणि स्वतःला अखिल महाराष्ट्र शेतकरी संघटनेचा अध्यक्ष म्हणून घोषित केले आणि आपलं नासिकचं आंदोलन चालू झाल्यानंतर दोन तीन दिवसांनी त्यानं जाहीर करून टाकलं की 'आम्ही हे आंदोलन मागं घेत आहोत.' झालं. वर्तमानपत्रांनी सगळ्यात मोठी बातमी दिली - सगळी जागा या बातमीनं भरली आणि इकडं आंदोलन चालूच

शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती । १२९