पान:शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती (Shetkari Sanghataana Vichar aani Karyapaddhti).pdf/१३०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

झालो आहोत अशी बोच लागून राहते. अशी भावना होणे ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. आपण संघटना करून तिच्या बळावर गावात एक ताकद निर्माण केली पाहिजे आणि गावात असं वातावरण निर्माण केलं पाहिजे की, आपल्याला कर्ज फेडता येत नाही ही जी आपली परिस्थिती आहे ती इंडियानं आपलं शोषण करकरून आपल्यावर लादलेली आहे, त्यात आपला काही दोष नाही. त्यामुळे त्यात आपल्याला अपमान वाटण्यासारखे काही नाही. उलट या स्थितीत आंदोलनाच्या काळात जो माल विकून आपलं कर्ज फेडण्याची धडपड करील त्याच्याच घराण्याच्या नावाला कलंक लागेल असं एक वातावरण तयार झालं पाहिजे. त्यासाठी संघटनेची ताकद वापरली पाहिजे. असं वातावरण निर्माण करणं काही कठीण नाही. आम्ही आमच्या चाकण भागात असं वातावरण निर्माण करून आंदोलनात एक कार्यक्रम राबवला आहे. गेल्या वर्षी कांद्याचा भाव ४५ ते ६० रु. दर क्विंटलला असा शासनाने जाहीर केला. त्याच्या मागच्या वर्षी भाव ५० ते ६५ रु. असा होता. म्हणजे क्विंटलमागे ५ रु. कमी भाव जाहीर झाला. आम्ही असं जाहीर केलं की हे क्विंटलमागे ५ रु. जास्तीचे जोपर्यंत मिळत नाहीत तोपर्यंत कुणीही शेतकरी सोसायटीचं किंवा बँकेचे कर्ज फेडणार नाही आणि मग गावात सोसायटीची किंवा बँकेची जीपगाडी जप्तीसाठी आली तर काय करायचं? तर प्रत्येक गावामध्ये सर्व बायामंडळीनी एकत्र व्हायचं, येताना घरातनं एक एक झाडू घेऊन यायचं आणि ज्याच्या घरची भांडी उचलणार असतील त्याच्या दारात जाऊन उभं राहायचं आणि गावातल्या पुरुषांनी बाजूला जाऊन उभं राहायचं आणि फक्त म्हणायचं की, 'आमच्या बायामाणसांच्या अंगाला हात लागता कामा नये.' त्यावेळी एकाही ठिकाणी जप्ती झाली नाही. जमिनीची जप्ती जर करायची असली तर खुशाल करू द्या. काय कागद इकडचे तिकडे करायचे ते करतील. लिलाव बोलायला कुणी येणार नाहीत. ते काय जमीन दिल्लीला घेऊन जाणार आहेत?

 शेतकऱ्याला आजपर्यंत इतकं नागवलं आहे की, त्यांच्याकडे कर्जवसुलीकरिता घेण्यासारखं काही राहिलेलंच नाही. आता गमवायला काही राहिलंच नाही तर जप्तीला कशाला घाबरायचं? तेव्हा इथे कर्जाच्या भीतीचा प्रश्नच नाही, प्रश्न हिमतीचा आहे. मी तंबाखूच्या शेतकऱ्यांना सांगितलं की, 'तुमची भाकरीची अडचण आम्ही कुठूनही ज्वारी आणून भागवू शकतो; पण एक गोष्ट आम्ही देऊ शकत नाही ती म्हणजे तुमची हिम्मत. ती तुमची तुम्हालाच कमवायला पाहिजे. हिम्मत

शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती । १३३