पान:शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती (Shetkari Sanghataana Vichar aani Karyapaddhti).pdf/१३१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असल्याखेरीज तुम्हाला किंमत मिळणार नाही. तंबाखूचं पीक काढताना त्याबरोबर एक एक हिमतीचं झाड लावता येत नाही. ती आपली आपणच तयार करायला हवी आणि त्यासाठी आपली संघटना व्हायला हवी.'
 त्याच्याशिवाय आणखी बारीक सारीक अडचणी निर्माण होतात- माल न विकल्यामुळे. घरच्या मुलीचं लग्न असतं त्यासाठी पैसा उभा करायचा असतो. माल विकल्याशिवाय ते शक्यच नसतं. अशा वेळी संघटनेने गावात असं वातावरण निर्माण केलं पाहिजे की, 'आधी लगीन कोंडण्याचे, मग रायबाचे.' तुमच्या मालाला भाव मिळाला म्हणजे द्या ना धूमधडाक्यात लग्न लावूत. अशा तऱ्हेचं वातावरण निर्माण केलं पाहिजे.

 निपाणी भागात आणखी एक प्रकार आहे. तिथले शेतकरी यल्लमाच्या यात्रेला जाण्याकरिता काय असेल तो तंबाखू मिळेल त्या भावाने विकून टाकतात. कितीही कमी भाव मिळो पण यात्रेला जायचंच. अशा प्रकारच्या रूढी शेतकऱ्यांच्यात खूप खोलवर भिनलेल्या आहेत. आपण आपल्या संघटनेबद्दल, आपल्याबद्दल, आपल्या कार्यकर्त्यांबद्दल शेतकऱ्यांत जो आदरभाव निर्माण झालेला आहे याचा वापर करून याच्यातल्या काही रूढी मोडून काढायला शेतकऱ्यांना तयार केले पाहिजे. अशा रूढींना चिकटून राहिल्यामुळे इंडियाचं शोषणतंत्र अधिक सुलभतेने आपलं शोषण करतं हे त्यांना पटवून दिलं पाहिजे. प्रसंगी असंही सांगितलं पाहिजे की, शेतकऱ्यांचा हा लढा अत्यंत महत्त्वाचा आहे, पवित्र आहे, धार्मिक आहे. तेव्हा लढा मोडून यल्लमाच्या जत्रेलासुद्धा जो कुणी जाईल त्याला यल्लमाचा शाप लागेल. आता कुणाच्या घरी दशपिंड घालायचाच प्रसंग आला तर लग्न जसं पुढं ढकलता येतं तसं दशपिंड काय पुढं ढकलता येणार आहेत? पण त्यालाही गावात वातावरण तयार केलं पाहिजे. शालिनीताई नाशिकला म्हणाल्या होत्या की, 'जोशी ब्राह्मण आहे. ठीक आहे. पण मी काही स्वतःला ब्राह्मण म्हणून म्हणवून घेत नाही. पण प्रसंग पडला तर मी असं म्हणतो की, 'मी ब्राह्मण म्हणून तुम्हाला सांगतो की आता आंदोलन चालू असताना जर तुम्ही माल विकून दशपिंड घातलेत तर तुमच्या पितरांना पिंड पोहोचणार नाहीत.' आपल्या संघटनेच्या साहाय्याने असं एक वातावरण निर्माण केलं पाहिजे की, शेतकरी शोषणास पूरक अशा या रूढींच्या प्रभावी पकडीतून बाहेर पडून त्याची ताकद वाढेल. आज आपली मुख्य अडचण भाकरीची आहे. फाटके कपडे घालायची सवय नाही असा शेतकरी सापडणारच नाही.

शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती । १३४