पान:शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती (Shetkari Sanghataana Vichar aani Karyapaddhti).pdf/१३३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकारे रस्ताबंदी, रेल्वेबंदी, साराबंदी, कचेरीबंद ही हत्यारं - तशी ही यादी करायची म्हटली तर फार मोठी होईल. ही सर्व हत्यारं दुसऱ्या टप्याची - पूरक हत्यार आहेत. यातलं कुठलंही मुख्य हत्यार होऊ शकत नाही. मुख्य हत्यार आहे माल मागे ठेवून घेणे. कारण तुमचा जर बाजारपेठेवर ताबा नसला तर कितीही दिवस रस्ता अडवा तुमचं आंदोलन यशस्वी होणार नाही. तुम्ही जर म्हटलंत की आज उठून इथं भाताचं आंदोलन सुरू करू या तर ते यशस्वी होणार नाही. कारण सगळ्या देशातलं फक्त साडेचार टक्के भात महाराष्ट्रातलं शेतीमालाच्या भावाविषयी पहिलं आंदोलन इगतपुरी भागात भाताविषयी झालं. अनेक शेतकरी तुरुंगात गेले. भाताचा भाव तोच राहिला. कारण बाजारपेठेवर ताबा असल्याशिवाय इतर कोणत्याही मार्गाचा परिणाम होऊच शकत नाही. आपल्या आंदोलनाचं तंत्र कसं आहे? तुम्ही काही वेळेला गोष्टी ऐकल्या असतील की, मुंबईच्या आमुक एक व्यापाऱ्यानं बाजारपेठेचा चांगला अभ्यास केला आणि मग खरेदी-विक्रीचे असे काही व्यवहार केले की, तो एका रात्रीत कोट्यधीश होऊन गेला. आपलंही तंत्र तेच आहे. बाजारपेठेचा बारकाईनं अभ्यास करायचा आणि मग शेतकऱ्याला अशा तऱ्हेनं उठवायचं-विक्री अशा तऱ्हेनं थांबवायची की, ज्याचा फायदा सर्व शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे. तंत्र तेच पण फायदा एकालाच मिळण्याऐवजी सगळ्या शेतकऱ्यांना मिळणार. या दृष्टीन आपण आजपर्यंत आंदोलनाची आखणी केलेली आहे. ज्याप्रमाणे शेतकरी- शेतमजुरांबद्दल सगळे लोक प्रश्न विचारतात की शेतकऱ्याला फायदा झाला तर तो शेतमजुरापर्यंत पोहोचेल याची शाश्वती काय? त्याचप्रमाणे आणखी एक प्रश्न सतत विचारला जातो की कांदा, ऊस, कपाशी अशा नगदी पिकांसाठीच शेतकरी संघटनेने आतापर्यंत आंदोलन केले आहे, शेतकरी संघटना ज्वारीसारख्या सर्वसामान्य मालासाठी का आंदोलन करीत नाही? किंवा त्यासाठी केव्हा आंदोलन करणार? यालाही कारणं आहेत. ती नीट समजावून घ्यायला हवीत. आपलं तंत्र काय? तर बाजारपेठेवर ताबा ठेवून मालाला भाव मिळविणे. जिथं जिथं आपण माल पाठविण्याचं थांबवलं तिथं तिथं त्याचा परिणाम झाला. केवळ रस्ता थांबवून किंवा रेल्वे थांबवून आंदोलन यशस्वी होत नाही. तुम्ही अगदी चिक्कार माणसं बसवली रस्त्यावर आणि सरकारनं ठरवलं की आंदोलन मोडून काढायचं तर ते अगदी पार सैन्य पाठवून मोडून काढू शकेल. पण त्याच्या मागोमाग जर बाजारपेठ तुमच्या हातात असेल तर सरकारला काही करता येणार नाही. तेव्हा बाजारपेठ ताब्यात असणे ही

शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती । १३६