पान:शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती (Shetkari Sanghataana Vichar aani Karyapaddhti).pdf/१३७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लक्षच देत नाहीत. कारण लोकांच्या मनात आता त्यांच्याविषयी काही अपेक्षाच राहिल्या नाहीत. लोक त्यांना प्रश्नही विचारत नाहीत की तुम्ही हे असं का केलं? मला लोक येऊन प्रश्न विचारतात की, 'तुम्ही अमुक अमुक आंदोलन स्थगित का केलं?' आणि शंका निरसन करून घेतात. याचा अर्थ असा की लोकांच्या मनात शेतकरी संघटनेविषयी आशा आहे. म्हणून ते येऊन आपल्याला विचारतात. 'दिंडी का बंद केली?' असं कुणी विचारतंय का? किंवा 'ती दिंडी झाली आता कशाला आणिक दिंडी काढताय तुम्ही?' 'काय भाव मिळाले का?...' मग तुम्ही गप्प का? असे प्रश्न त्यांना कुणी विचारत नाहीत. उलट - दिंडी वगैरे काढून गप्प बसलेली मंडळीच आपल्यावर टीका करीत सुटतील की, 'हे आंदोलन केव्हाही सुरू करतात आणि केव्हाही बंद करतात.' त्यामागील भूमिका समजून घेण्याची त्यांची तयारीच नसते.
 अशा पद्धतीने आंदोलनात पहिल्यादा उतरवतो आहोत. स्वातंत्र्याच्या लढ्यातसुद्धा शेतकरी मोठ्या प्रमाणावर तुरुंगात गेला नाही. आज नासिक, नगर या भागातील ३१ हजार शेतकरी तुरुंगात जाऊन राहिले आहेत. ही फार प्रचंड ताकद आहे. शेतकऱ्याने एकदा जरी तुरुंगाच्या आतला भाग बघितला आणि एकदा त्याची तेथील घोंगड्याची, वाडग्यांची आणि ताटल्यांची भीती गेली की मग तो कुणाच्या बापाला भिणार नाही. ही एक मोठी गोष्ट आपण या आंदोलनातनं मिळविली आहे. शेतकऱ्याला आंदोलनात उतरवताना आपल्या पोळ्या पटकन भाजून घ्यायच्या आहेत तेव्हा त्याला जास्तीत जास्त उठवा, जास्तीत जास्त पेपरातून जास्तीत जास्त प्रसिद्ध करा अशी वृत्ती ठेवता कामा नये. असा बेत जर तुम्ही आखाल तर तुमचा डाव पडेल. या नव्या पहिलवानाला आंदोलनाच्या आखाड्यात अशा तऱ्हेनेच उतरवायला पाहिजे की तो मोडणार नाही, त्याच्या कुस्त्या त्याच्या ताकदीच्याच घेतल्या पाहिजेत.

 आज दुसरी भावना महाराष्ट्रात आहे की, 'काय या जोशींना करावं? हे आंदोलन स्थगित करतात, नाही तर आम्ही आता जाऊन आंदोलन केलं असतं.' घोडं असं फुरफुरत राहायला हवं. उलट जर असं म्हणायला लागले की, 'काय करावं, जोशी आम्हाला आंदोलनात फार पाठवतात,' तर लक्षात ठेवा की आपलं कुठतरी चुकतं. तेव्हा आपण नवीन माणसाला, सबंध नवीन समाजाला आंदोलनात उभं करतो आहोत याची जाणीव सतत ठेवून त्याला भलत्यावेळी आणि कारण नसताना

शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती । १४०