पान:शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती (Shetkari Sanghataana Vichar aani Karyapaddhti).pdf/१३८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आंदोलनात उतरवता कामा नये. त्याला आपण काहीतरी करतो आहोत असं समाधान वाटत राहिलं पाहिजे, जावं आणि आंदोलन करावं असं वाटत राहिलं पाहिजे. आंदोलन म्हणजे आनंद देणारी गोष्ट झाली पाहिजे, कष्टाची-जुलूम जबरदस्तीची गोष्ट झाली तर एकदा जरी तो साथ द्यायला आले असले तरी पुढच्या वेळी आंदोलनात उतरायचे नाहीत.
 आंदोलनात कसं उतरायचं, हत्यारं कशी बदलायची यालासुद्धा एक विचारसरणी हवी. आम्ही आंदोलन सुरू करतो, स्थगित करतो, पुन्हा सुरू करतो, आणखी काय काय पन्नास गोष्टी करतो आणि त्यामुळे शहरातल्या नव्हे तर गावातल्याही लोकांच्या डोक्यांत चिंता पडते की, 'अरे, हे काय करतात तरी काय? -त्यांचं काय चाललं आहे?' यावर साधं उत्तर म्हणजे, 'हे विमान चालविणाऱ्या वैमानिकाला मागच्या एखाद्या प्रवाशानं सांगण्यासारखं आहे की, 'तुम्ही असं काय विमान चालवता?' विमान चालविणारा तिथं बसलेला असतो, त्याला हवामानाची परिस्थिती ठाऊक असते, विमानाची परिस्थिती माहीत असते. त्याप्रमाणे तो विमान चालवीत असतो. पण तो त्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकणार नाही. किंवा 'गावस्कर हा क्रिकेट संघाचा प्रमुख आहे. त्याच्या सामन्याचं वर्णन आम्ही रेडिओवर ऐकायचं आणि इथं बसून म्हणायचं, 'हे असं नको होतं करायला, काही तरी वेगळं करायला हवं होतं.' यात काही अर्थ नाही. कारण त्याच्यासमोर ज्या गोष्टी असतात त्या त्याला माहीत असतात. त्याप्रमाणे तो आपले निर्णय घेत असतो. त्याच्या समोर ज्या गोष्टी असतात त्या त्याला माहीत असतात. त्याप्रमाणे तो आपले निर्णय घेत असतो. त्याच्या समोर ज्या गोष्टी असतात त्यांची आपल्याला माहिती नसते. आम्ही फक्त तिथल्या खेळपट्टीचं वर्णन वाचलेलं किंवा ऐकलेलं असतं. प्रत्यक्ष त्या क्षणाला ती कशी दिसते हेही आपल्याला कधी माहीत नसते? अशा प्रकारे टीका करायची काही लोकांना सवयच असते. याहून भयानक प्रकार पाहा. बांगला देशचं युद्ध चालू असताना रेडिओवरून तासातासाला बातम्या दिल्या जात. त्या ऐकून आपलं सैन्य कुठं कुठं गेलंय हे बघायचं आणि म्हणायचं की, 'हे चूक आहे. माणकेशानं इकडून सैन्य न्यायला हवं होतं- इकडून न्यायला नको होतं... वगैरे.'

 आता टीकांना काही अर्थ नसतो. आमच्या नासिक आंदोलनाच्या काही गोष्टी पहा. त्याविषयी वर्तमानपत्रांतून ज्या बातम्या आल्या त्या पन्नास टक्के तरी चूक होत्या. काही बातम्या चुकीच्याच जातील अशी आम्ही दक्षता घेतली होती. हे

शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती । १४१