पान:शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती (Shetkari Sanghataana Vichar aani Karyapaddhti).pdf/१३९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आर्थिक आंदोलन आहे, डावपेचांचं आंदोलन आहे. जर सगळेच आम्ही सांगत सुटलो तर आमचे डावपेच लागू होणार नाहीत. आंदोलनामध्ये खरं काय घडलं याचं मूल्यमापन करायचं असलं तर ते आंदोलननंतर दोनपाच वर्षांचा काळ गेल्यानंतरच करायला हवं. नासिकच्या आंदोलनातील काही निर्णय आम्ही कशा परिस्थितीत घेतले आहेत पाहा.

 १ ऑक्टोबरपासून तिथं पाऊसच पडला नव्हता १० नोव्हेंबरला आम्ही रस्ता बंद केला आणि १२ नोव्हेंबरला संध्याकाळी सबंध जिल्हाभर पाऊस झाला. फार मोठा पाऊस झाला. सगळे शेतकरी दीड महिना पावसाची वाट पाहत होते. पाऊस पडल्यावर ऑक्टोबरसारखी थंडी पडली. आम्ही बायकामुलांसहित माणसं रस्त्यावर आणून बसवली होती. रात्री बसून राहायचं म्हटलं तरी थंडीचा प्रश्न होताच. त्यात दीड महिना वाट पाहिल्यानंतर पडलेला पाऊस पाहून शेतकऱ्याच्या मनाची स्थिती काय होत असेल हे एक शेतकरीच जाणे. पाऊस पडल्यानंतर शेतकऱ्याला जी काही कामं करायची असतात ती जाऊन करावीशी वाटणारच. अशा वेळी आंदोलनाच्या तंत्रात थोडा फार बदल करायला नको का? हे लक्षात घेऊनच आम्ही २४ ते ४८ तासांची सुटी जाहीर केली. तेव्हा सगळ्या लोकांनी आंदोलन स्थगित केलं म्हणून जोराजोरात टीका केली. पण जिल्हाभर झालेल्या पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबद्दल कुणी अक्षरही काढलं नाही. आपण ही दोन दिवसांची माघार घेताना आंदोलनाची परिस्थिती की ११ नोव्हेंबरच्या रात्रीपासून १२ नोव्हेंबरच्या दुपारपर्यंत जवळजवळ ९ हजार शेतकरी लाठ्या खाऊन जखमी झाले होते. बाहेर राहणाऱ्या मंडळींना 'आंदोलन आणखी चालत राहायला हरकत नाही.' असं वाटत राहून काय उपयोग? खर तर ही मंडळी घाबरून आंदोलनात भाग घ्यायला कचरत होती. उलट स्थगिती जाहीर केली तरी शेतकरी मागे हटायला तयार नव्हते. मंगरूळ फाट्यावर जे ४० हजार शेतकरी रस्त्यावर बसून होते त्यांची परत जाण्याची व्यवस्था आम्ही करायला गेलो होतो त्यावेळी त्यांना म्हटलं की, 'तुम्हाला पुन्हा इकडे यायला ट्रॅक्टर वगैरे पाठविण्याची व्यवस्था करतो.' त्यावेळी ते म्हणाले, 'ट्रॅक्टर वगैरे नाही पाठविलात तरी चालेल पण दारूगोळा पाठवा.' लोक इतके उत्तेजित झालेले होते, की दोन ठिकाणी पुलांवर उखळी खणून त्यात सुरुंगाची दारू भरून त्यात वाती घातलेल्या होत्या. लोकांची समजूत घालून मला त्या स्वतः काढून टाकाव्या लागल्या.

शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती । १४२