पान:शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती (Shetkari Sanghataana Vichar aani Karyapaddhti).pdf/१४०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 कसबे-सुकेण्याला जे रेल्वे रोको आंदोलन झालं तिथं चारशे स्त्रिया सत्याग्रहाला बसल्या होत्या. तिथं चार चार एस.आर.पी. नी एकेका स्त्रीला दोघांनी दोन हात आणि दोघांनी दोन पाय धरून उचलून बाजूला नेण्यास सुरुवात केली. असं होत असताना एका बाईची साडी निसटली आणि चोळी फाटली. ग्रामीण भागात या प्रकाराचा परिणाम काय होईल याची कल्पना सगळ्यांनाच आहे. बाईच्या अंगाला हात लागला तर त्याबद्दलचा ग्रामीण भागातील संताप फार भयानक असतो. हा प्रकार झाल्यानंतर मला तिथं पोहोचायला तासभर वेळ लागला. पण तोपर्यंत एका बाजूला रेल्वेची दोन इंजिनं धडाड पेटलेली होती आणि जिथं जिथं नाला आहे. तिथं तिथं गवत टाकून रूळांखालचे स्लीपर्स जाळायला सुरुवात झालेली होती. अशा या (भावनात्मक) उद्रेकाच्या वेळी जर आंदोलन मागे घेण्याचा निर्णय झाला नसता तर मनमाड ते नासिक या रेल्वेरस्त्याचा काहीही भाग सकाळपर्यंत जाग्यावर राहिला नसता. तसं जर झालं असतं तर तुम्हाला वाटलं असतं की, 'आंदोलन फार चांगलं झालं; ऊस आणि कांद्याच्या बाबत चांगली धमकी तयार झाली होती.' पण अशी धमकी शासनाला देताना आपण एका सशस्त्र ताकदीसमोर आपली ताकद उभी करतो आहोत, तिला आव्हान देत आहोत हे लक्षात घ्यायला हवे. आपण जे युद्ध लढतो आहोत ते चालविण्याची आपली ताकद नेमकी किती आहे याची जाणीव ठेवली पाहिजे. पण आपण लढतो आहोत ते दिडक्यांचं युद्ध. मालाला भाव मिळावा म्हणून स्वातंत्र्याकरिता कुणी म्हटलं की हजारो माणसांनी जीव द्यायला हवा तर ठीक आहे. पण उसाला भाव मिळायला पाहिजे म्हणून काही अगदीच जीव टाकायची आवश्यकता नाही. तेव्हा असं तंत्र सांभाळून आंदोलन करायचं आहे. शक्य तितक्या कमी वेळाच आंदोलन करायचं, जास्तीत जास्त वेळा आंदोलनाची धमकी वापरूनच काही पदरात पाडून घेता येतं काय पाहायचं. आंदोलन हे आपलं उदिष्ट नाही, आंदोलन हे आपलं साधन आहे. त्याच्या साहाय्याने आपल्याला आपल्या मालाला भाव मिळवून घ्यायचा आहे. तेव्हा आंदोलन उभं करताना, स्थगित करताना, बोलणी करताना नेहमी हिशेब करायला पाहिजे की आंदोलन उभं करणं जास्त महत्त्वाच आहे, आज आपल्याला जे मिळालं आहे त्यापेक्षा जास्त आंदोलन उभं केलं तर मिळण्याची शक्यता आहे की वाटाघाटी चालू असताना त्या मुद्दाम उधळून लावून शासनातील काही प्रमाणात ज्या व्यक्ती बऱ्या असतात त्यांची मनं मुद्दाम दुखावून जर आंदोलन चालू केलं तर यशाची

शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती । १४३