पान:शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती (Shetkari Sanghataana Vichar aani Karyapaddhti).pdf/१४१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शक्यता वाढणार आहे की वाढणार नाही?
 शेवटी वाटाघाटींबाबत राग ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. खरं तर आंदोलन चालू करण्यापूर्वी वाटाघाटींची जी जी शक्यता आहे ती संपवून मगच आंदोलन सुरू केलं पाहिजे. काही लोकांचं मत असं दिसत नाही. पण आंदोलन चालू झाल्यानंतर पोलिस कसे वागतील हे आपल्याला सांगता येणार नाही आणि आपली माणसंही कशी वागतील हेही आपल्याला सांगता येणार नाही. आंदोलन झाल्यानंतर आंदोलनात बळी पडलेल्या माणसांच्या घरी जाण्याचा ज्यांच्यावर प्रसंग आलेला आहे त्यांच्यापैकी कुणी असं नक्कीच म्हणणार नाही की, 'वाटाघाटी राहू द्या बाजूला, आंदोलन झालचं पाहिजे.' काही झालं तरी चालेल पण आंदोलन हे झालंच पाहिजे असं फक्त बेजबाबदार माणसंच म्हणू शकतात. माझा असा आरोप आहे की असं म्हणणारी किंवा हे आंदोलन स्थगित का करतात, चालू का करत नाही असं म्हणणारी जी मंडळी आहेत त्यांनी आंदोलन काळात काहीही केलेलं नसतं. ज्यांनी प्रत्यक्षात आंदोलनात भाग घेतला, काही सोसलं त्या नासिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी असं कधी म्हटलं नाही. आता कांद्याबद्दल कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे तरी माझ्याकडं तारा येऊन पडल्यात की, 'तुम्ही आम्हाला शब्द द्याल तेव्हाच आम्ही आंदोलन सुरू करू त्याशिवाय नुकसान आलं तरी करणार नाही.' कारण त्यांची खात्री आहे की, 'ज्यावेळी आंदोलन करायला पाहिजे त्या वेळी मी आपणहून सांगेन.' आंदोलनाच्या तंत्राबद्दल शेतकऱ्यांची काही तक्रार नाही. पण टीका करणाऱ्यांचा थयथयाट चालला आहे. त्याचं तसंच कारण आहे. शेतकऱ्याला आपल्या स्वार्थाकरता राबवून घ्यायला सोकावलेली ही मंडळी आहेत. हे शेतकरी आंदोलनही आपल्या स्वार्थाकरता राबवून घेण्यासाठी ही पक्षीय मंडळी टपून बसली होती. पण आंदोलन स्थगित केल्यामुळे त्यांची फार निराशा झाली. त्यांचे हिशेब चालले होते की हे सरकार पडलं तर मी मुख्यमंत्री होईन, मंत्री होईन, कसला तरी चेअरमन होईन. तवा चांगला तापत चालला आहे हे पाहून यांनी कणिक मळायला घेतली आणि यांची कणिक मळून होईपर्यंत आम्ही तवा काढून घेतला म्हणून यांना इतका राग आला. याच्यापलीकडे या रागाला काही अर्थ नाही आणि या रागाकडे आपल्याला लक्ष देण्याचं कारण नाही.

 मुख्य मुद्दा असा की शेतकरी आंदोलन हे आर्थिक आंदोलन आहे. ते काही लोकांना पेटवून देऊन चालत नाही. हे पोटाच्या खळीतनं निर्माण झालेलं आंदोलन

शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती । १४४