पान:शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती (Shetkari Sanghataana Vichar aani Karyapaddhti).pdf/१४२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आहे. आपण ते अशा शिस्तीने चालवलं पाहिजे की जेव्हा बंद करा असा आदेश येईल तेव्हा बंद होईल आणि चालू करा असा आदेश येईल तेव्हा चालू होईल.
 यावर डावी मंडळी-कॉम्रेड घुमे, अहिल्या रांगणेकर यांच्यासारखी मंडळी टीका करतात. त्याला कारण त्यांची आंदोलनांची आजवरची पद्धत आहे. काही एका भागामध्ये एखादा वादाचा मुद्दा उपस्थित झाला की, तिथे लोकांना पेटवून द्यायचं आणि पेटवून दिल्यानंतर तिथं जे घडेल त्याला आंदोलन म्हणायचं आणि ते सतत चालू ठेवायचं कारण असं आंदोलन एकदा थंड झालं की पुन्हा पेटत नाही. एखादी गाडी कशी किल्ली देऊन सुरू होत नाही, तिला धक्का मारावा लागतो, मग कुठं थांबायची वेळ आली की ड्रायव्हर म्हणतो, 'बंद नको करायला, चालूच राहू द्या.'
 आमचं आंदोलन किल्ली फिरवून केव्हाही चालू होण्याची खात्री आहे म्हणून इंजिन बंद करायची आम्हाला भीती वाटत नाही.
 आंदोलन करताना काही गोष्टी विशेषत्वाने लक्षात ठेवायला हव्यात. आंदोलन करताना किंवा आंदोलनाचे हत्यार निवडताना कोणत्या पदार्थाचा तुटवडा केव्हा आहे हे लक्षात घेतले पाहिजे. आम्ही २५ मे ला दूध आंदोलन करू म्हणून जाहीर केले आहे. मे, जून, जुलै हा काळ म्हणजे दुधाच्या तुटवड्याचा मोठा काळ आहे. अशा काळात दूध थांबवलं तर शेतकऱ्याचं कमीत कमी नुकसान होऊन दुसऱ्या बाजूला जास्तीत जास्त कळ लागेल. त्याचप्रमाणे २५ मे ही तारीख ठरवताना आणखी एक गोष्ट लक्षात घेतली ती म्हणजे २५ तारखेनंतर लग्नाचे मुहूर्त येतात. त्यामुळे दूध पुरवलं नाही तर परिणाम जास्त होईल. युद्ध आखताना जसं त्या रणभूमीवर कुठं कुठं काय आहे, कुठं टेकडी आहे, कुठं झाडं आहेत, कुठं नदीनाला आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे तसंच आपलं आंदोलनही तयार झालं पाहिजे. त्याचप्रमाणे नवीन पिकं वगैरे केव्हा निघणार आहेत याचाही अंदाज घेतला पाहिजे.

 हवामानही फार महत्त्वाचं आहे. आम्ही २८ नोव्हेंबरला रस्त्यावरचं आंदोलन जेव्हा बंद केलं तेव्हा टीकाकारांनी एका गोष्टीचा उल्लेख कुठे केलाच नाही. नासिकमध्ये २४/२५ नोव्हेंबरपासूनच अतोनात थंडी पडू लागली होती. त्यावेळी लोकांना, लहान मुलांना रस्त्यावर बसवणं शक्य नव्हतं किंवा मग सगळ्यांना घोंगड्या-बिंगड्या असा ढीग आणावा लागला असता. त्यामुळेच २८ नोव्हेंबरनंतर

शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती । १४५