पान:शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती (Shetkari Sanghataana Vichar aani Karyapaddhti).pdf/१४३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

रस्त्यावरचं आंदोलन चालू ठेवणं शक्य नव्हतं. त्याच्यानंतर सटाण्याच्या मेळाव्यात जो कार्यक्रम आम्ही जाहीर केला तो नीट तपासून पाहा. आम्ही जाहीर केल्याप्रमाणे पुढील कार्यक्रम हा कचेऱ्यात जाऊन बसण्याचा आहे, रस्त्यांवर नव्हे. तेव्हा हवामानाचा अंदाज जरूर घ्यायला हवा. डिसेंबरच्या पहिल्या पंधरा दिवसांत नासिक जिल्ह्यात गव्हाच्या पेरणीचा हंगाम असतो. त्यात पाऊस पडला. त्यामुळं शेतीच्या कामाकरता लोकांना मोकळं करणं आवश्यक आहे हे लक्षात घेऊनच २८ नोव्हेंबरला आंदोलन मागं घेतलं.

 आंदोलनाच्या बाबतीत आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आंदोलन कोणत्याही पद्धतीचं का असेना ते संपूर्णतः शांततेने आणि अहिंसेने झाले पाहिजे. जर का आंदोलनाला हिंसक वळण लागलं तर ती मोठी दुर्दैवाची गोष्ट ठरेल. कारण मग तुमचं आंदोलन दडपून खलास करून टाकलं जाईल त्यावेळी तुम्हाला वाटेल की दोन दिवसांत तुमचं आंदोलन खूप वाढलं पण दीर्घ मुदतीत शेतकरी आंदोलन आणि शेतकरी संघटना संपून जाईल.शेवटी आपली ताकद कुठं उद्धवस्त करण्यात किंवा पेटवण्यात नाही. आपली ताकद संख्येत आहे. देशात ५२ कोटी शेतकरी आहेत. हे सगळेच्या सगळे शेतकरी आपण केव्हा उभे करू शकू? नासिक जिल्ह्यात दोन लाख शेतकरी एकत्र झाले आणि आपण उसाला ३०० रु. टन भाव मिळवला. महाराष्ट्रात १० लाख शेतकरी ज्वारी पिकविणारा आहे. हा दहा लाखांचा आकडा जर आज तुरुंगात जायला एकत्र झाला तर उद्या ज्वारीच्या किलोला २.३० चा भाव मिळवून घेता येईल. पण ही संख्या जोवर उभी करता येत नाही तोवर नुसतं तुम्ही कांद्याचाच प्रश्न आधी का घेतला आणि उसाचाच आधी का घेतला असं म्हणण्यात काही अर्थ नाही. माझा व्यवहार चोख आहे. तुम्ही १० लाख माणसं द्या, मी उद्या ज्वारीला भाव मिळवून देतो. पण जर कुणाची कल्पना असेल की जसं आमदार-खासदार आले की त्यांना आपण म्हणतो की, 'साहेब, आमचं हे एवढं काम करून द्या.' तसं जोशींना सांगितलं, 'आमच्या ज्वारीला भाव मिळवून द्या.' की भाव मिळून जाईल तर ते चूक आहे. अशानं काही भाव मिळणार नाही. ज्वारीचा भाव तुमचा तुम्हाला मिळवायचा आहे. निपाणीला एका वक्तानं एक चांगलं उदाहरण वापरलं - "तुम्ही असं समजू नका की शेतकरी संघटना किंवा शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आले आहेत. त्यांना सांगायचं की, जरा झाडावर चढा आणि आंबे काढा. तुम्ही काढल्यावर मग ते आपण मिळून खाऊ आणि जर तुम्ही

शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती । १४६