पान:शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती (Shetkari Sanghataana Vichar aani Karyapaddhti).pdf/१४४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

झाडावरून पडलात तर आम्ही म्हणू, 'तुम्हाला झाडावर चढता येत नव्हतं तर चढलात कशाला?' तेव्हा आंदोलन म्हणजे असं काही नाही. ते सगळ्यांनी मिळून लढायचं आहे." सगळीकडे मिळून आपली ताकद काय आहे हे लक्षात घेऊन नेमक्या ठिकाणी प्रहार करायचा आहे. मराठ्यांच्या इतिहासात ज्याला गनिमी कावा म्हणतात त्या तंत्रानं हे आंदोलन चालवायचं आहे आणि संख्या हे त्याचं बळ आहे.
 बाजारपेठेवर ताबा ठेवणे हे आपलं आंदोलनातील मुख्य हत्यार आहे. पण कांदा, ऊस आंदोलनांच्या वेळी आपण त्या मार्गाने सरकारचे नाक दाबू शकलो नाही. शेवटी आपल्याला रास्ता रोको, रेल्वे रोको या मार्गानीच सरकारचे नाक दाबावे लागले. त्याचा परिणामही झालेला दिसला. मग याच मार्गांचा सुरुवातीलाच वापर करायला काय हरकत आहे असं कुणाला वाटून जाईल.
 कांदा आणि ऊस दोनही बाबतीत बाजारपेठ पूर्णपणे आमच्या ताब्यात नव्हती. म्हणून मग 'चिमटा' जास्त लागण्यासाठी आम्ही रस्ताच वापरला. पण आम्ही जर नुसते रस्तेच बंद केले असते आणि बाजारपेठेत आमची काहीच ताकद असल्याशिवाय दुसऱ्या मार्गांचा काहीच उपयोग नाही. जर साखर थांबविण्याची ताकद आमच्यात नसती तर दोन लाख माणसं रस्त्यातनं काढणं पोलिसांना आजिबात कठीण नाही. त्यांना आदेश मिळाले की ते आपलं काम झटपट करतात. त्यांना त्याचं शिक्षण मिळालेलं असतं. ११ तारखेच्या रात्री पोलिसांनी दोन लाख माणसं अत्यंत कार्यक्षमतेनं रस्त्यातून फिरवल्या. १० गाड्यांतून २५० हमाल उतरायचे आणि रस्त्यावरचे दगड, झाडं काय असतील ते भराभरा बाजूला करायचे तर दुसऱ्या १० गाड्यांतून तितकीच एस.आर.पी.ची. माणसं उतरून सत्याग्रहींच्या मधून फिरत त्यांच्या डोक्यांत काठी घालून त्यांना बाजूला करीत. त्यांनी झोपलेल्या सत्याग्रहींनाही झोडपले. सायकली-मोटारसायकलींची त्यांच्यावर मोठमोठे दगड घालून मोडतोड केली. एका ठिकाणी तर एक मोटारसायकल पुलाखाली टाकून दिली होती. अशा पद्धतीने ते सबंध रस्त्यात झोडपत झोडपत गेले. त्यांना याचं शिक्षण मिळालेलं असतं. तेव्हा आपण रस्ता कायमचा अडवून ठेवू शकू ही कल्पना चुकीची आहे. तिथं मग आंदोलनाला हिंसक वळण लागेल.

 चाकणचं रास्ता रोको आंदोलन यशस्वी झालं त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे तिथं वापरलं गेलेलं बैलगाड्यांचं तंत्र नवीन होतं. शासनाला काय करावं याचा

शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती । १४७