पान:शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती (Shetkari Sanghataana Vichar aani Karyapaddhti).pdf/१४५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विचार सुचायच्या आत परिस्थिती त्यांच्या हाताबाहेर गेली. ५/१० हजार माणसं चाकणला शांतपणे बसली होती. तिथं गोळीबार किंवा लाठीहल्ला झाला नाही यालाही कारणं आहेत. एवढ्याशा लहान गावातच मी स्वतः उपोषण करीत बसलो होतो. नासिकच्या आंदोलनासंदर्भात हा फरक आहे. एकदा तुमची आंदोलनची पट्टी २५० कि.मी. वर गेली-महाराष्ट्रभर गेली की जो काही एखाद्या व्यक्तिमत्त्वाच्या प्रभावाचा भाग असतो त्याचा परिणाम इतक्या मोठ्या क्षेत्रात जाणवत नाही. तेव्हा रस्ता मोकळा करायचा म्हटले की केला. दुसरी गोष्ट म्हणजे नासिकला आपण मुंबई-आग्रा रस्ता अडवला म्हणजे सबंध देशाचचं नरडं दाबलं. त्यात ३६ तास रेल्वे लाईनही बंद पाडली. त्यामुळे दिल्ली-मथुरेपासून गाड्या रेल्वेलाईनवरच उभ्या होत्या. (इतकं हे प्रभावी हत्यार आहे.) त्यामानाने पुणे-नासिक रस्ता कमी महत्त्वाचा.
 चाकणलासुद्धा रस्ता अडविल्यानंतर ४८ तासांनंतर आम्ही एसटी गाड्या सोडून दिल्या. नंतर एसटी गाड्या यायच्याच बंद झाल्या. पण पहिल्या ४८ तासांत तिथे सुमारे १२० गाड्या साठल्या. त्यामुळे तिथेही एक उलट दबाव निर्माण झाला. १२० गाड्या म्हणजे ६००० प्रवासी अडकून पडले आणि आमचे सत्याग्रही होते फक्त ३५००. त्या गाड्यांमध्ये एक कुठल्यातरी मुलींच्या शाळेच्या ट्रीपची गाडी होती. आम्ही त्यांच्यासाठी दुधाची, जेवणाची वगैरे व्यवस्था केली. पण तिथं असं एक वातावरण तयार झालं होतं की त्या मुलींचा मोर्चा घेऊन त्यांचे शिक्षक आले आणि आम्हाला सोडा असं म्हणू लागले. म्हणजे उलट्या बाजूनेसुद्धा दबाव सुरू झाला. त्यामुळे त्या गाड्या सोडणे भाग पडले. तेव्हा रस्ता रोको किंवा अशी जी साधने आहेत ती नेमकी, अगदी तोळामासा मोजून वापरली पाहिजेत.
 ती जर फार अतिशयोक्तीने वापरली तर त्याच्यामध्ये आपल्यालाच मार पडतो. शेवटी आपली ताकद ही बाजारपेठेत असणे हे मुख्य हत्यार आहे हे लक्षात ठेवायला पाहिजे.

 आपलं आंदोलन शांततामय असलं पाहिजे आणि अशा तऱ्हेचं शांततामय आंदोलन चालू असताना जर शासनानं दडपशाही सुरू केली तर आंदोलक जमावाची सहनशक्ती संपण्याची शक्यता आहे आणि जमाव हिंसक होण्याची शक्यता आहे. आंदोलकांची सहन करण्याची मर्यादा ज्या क्षणी संपेल त्या क्षणी मी आंदोलन मागे घेईन पण त्याला हिंसक वळण लागू देणार नाही. मी मुळीच 'अहिंसा तत्त्वज्ञान

शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती । १४८