पान:शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती (Shetkari Sanghataana Vichar aani Karyapaddhti).pdf/१४६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मानणार नाही. इथं गांधीवादी अहिंसेचा प्रश्नच निर्माण होत नाही. पण हा डावपेचाचा प्रश्न आहे. कोणत्याही तऱ्हेची हिंसा करणे हे तुमच्याच पायावर धोंडा पाडण्यासारखे आहे. जी दोन माणसांची डोकी फुटली किंवा दोन माणसं मेली तरीसुद्धा आज त्याची हिंसक प्रतिक्रिया होता कामा नये. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण आपण ज्या शक्तीशी लढतो आहोत तिची ताकद प्रचंड आहे. आपल्या देशात सशस्त्र आंदोलनाचा प्रयत्न झालेला नाही कारण १९१४ सालापर्यंत लष्कराच्या हाती जी काही शस्त्र असायची आणि जनतेच्या हातात जी शस्त्र असायची यांच्यात फारसा फरक नसे. आज त्याच्यामध्ये फार फरक आहे. अशा स्थितीत जर अहिंसक मार्ग सोडून किंवा सविनय सत्याग्रहाचा मार्ग सोडून दुसऱ्या कोणत्याही मार्गानं जायचं असेल तर त्याला संपूर्ण यादवीखेरीज दुसरा मार्ग नाही. तात्पुरतं शौर्य गाजवल्यासारखं वाटेल पण त्यामध्ये शेवटी आपला पराभव निश्चित आहे. तेव्हा युद्धामध्ये हत्यार कोणतं वापरतो यापेक्षा बुद्धी कितपत वापरतो हे जास्त महत्त्वाचं.

 ■ ■

शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती । १४९