पान:शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती (Shetkari Sanghataana Vichar aani Karyapaddhti).pdf/१४९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

एक पाऊलवाट आहे.
 स्वातंत्र्यानंतर शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील या स्वप्नाच्या मृगजळावर शेतकरी जगले. पण शोषणव्यवस्था स्वातंत्र्यानंतरही पद्धतशीरपणे जोपासली गेली. शेतकऱ्यांच्या रास्त भावाच्या आंदोलनाला चिरडून टाकण्याचे शासकीय प्रयत्न म्हणजे या शोषणव्यवस्थेला टिकवून धरण्याचे प्रयत्न आहेत. हा क्रूर डाव शरद जोशींनी विचार व आंदोलनांमधून शेतकऱ्यांच्या लक्षात आणून दिला. हे त्यांचे महान कार्य आहे. म्हणूनच ते स्वातंत्र्यानंतरचे सर्व श्रेष्ठ (क्रियाशील) विचारवंत ठरतात.
 या पुस्तकाने जोशी व संघटना यांच्यावर ऊठसूट टीका करणाऱ्या, विपर्यस्त बातम्या देणारी वृत्तपत्रे, नेतेमंडळी यांचाही फायदा होणार आहे. आधी टीका करून नंतर ती मागे घ्यायची किंवा काही सारवासारव करायची असे त्यांना आता, हे पुस्तक वाचल्यावर करण्याची जरूरी नाही. शेतकरी प्रकाशनाच्या तीन पुस्तकांनी त्यांचा स्व-प्रबोधनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
 या पुस्तकाचे काम-कॅसेट्सचे शब्दांकन करून-सौ. लीलाताई जोशी यांनी सुरू केले होते. शेतकरी संघटनेच्या प्रारंभापासून त्यांनी शेतकऱ्यांसाठी कार्य करायला सुरुवात केली होती. परदेशातील सुखासीन जीवनाचा त्याग करून त्यांनी हे कार्य हाती घेतले होते. विविध आंदोलनांच्या वेळी शरद जोशी व इतर नेते तुरुंगात असताना त्यांनी कणखरपणे कार्य चालू ठेवलेले होते. आपणा सर्वांच्या दुर्दैवाने आज त्या आपल्यात नाही.
 हे पुस्तक मी सौ. लीलाताई जोशींच्या स्मृतीला अर्पण करतो.

 १० डिसेंबर १९८२
 आनंद भुवन, अलिबाग.

सुरेश घाटे

शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती । १५१