पान:शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती (Shetkari Sanghataana Vichar aani Karyapaddhti).pdf/१५१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मोठ्या प्रमाणावर झाली आहे, की कार्यकर्त्यांची फौज, पलटण तयार करणे आवश्यक झाले आहे. थोड्या माणसांचे हे काम नव्हे. शेतकऱ्यांच्या मनात ज्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत त्या पाहिल्या तर आपापल्या भागात हा विचार स्वयंभूपणे मांडू शकतील अशी कार्यकर्ती मंडळी तयार करणे आवश्यक आहे. अशा मंडळींच्या प्रशिक्षणाचा हेतू या शिबिरामागे आहे.
 या शिबिरात कोणत्या प्रकाराने काम होणार आहे याची रूपरेषा मी सांगतो-
 शेतकरी संघटनेच्या विचाराच्या चर्चेच्या सोयीकरिता मी तीन भाग पाडलेले आहेत:-
 (१) अर्थशास्त्रीय विचार, ज्यात मुख्यतः विचारांची चौकट चर्चिली जाईल.
 (२) शेतकरी संघटनेची बांधणी, त्यातील अडचणी आणि योजावयाचे मार्ग.
 (३) शेतकरी आंदोलने, त्यांची तंत्रे आणि साधने.

 अर्थशास्त्रीय विचार करताना मूळ चौकट आपल्याला अशी लक्षात घ्यायची आहे की, जो तो या देशात आपल्या वर्गाचा किंवा व्यवसायाचा स्वार्थ बघतो आहे, याला कोणतीही संघटना अपवाद नाही. माझ्या कल्पनेतील जी शेतकरी संघटना आहे, ती जरी शेतकऱ्यांची असली तरी ती एका वर्गाच्या किंवा व्यवसायाच्या हितसंबंधाचे रक्षण करणारी नाही. हा बहुसंख्य वर्ग शेतकरी आहे आणि जे शेतकऱ्यांच्या हिताचे आहे तेच देशातील आमजनतेच्या हिताचे आहे; एवढेच नव्हे, तर शेतीचा प्रश्न सुटल्याखेरीज दारिद्र्याचा प्रश्न सुटू शकत नाही म्हणून शेतकऱ्यांचा प्रश्न महत्त्वाचा आहे. या पायावर शेतकरी संघटनेटे अर्थशास्त्र उभे आहे. शेतकऱ्यांच्या, देशाच्या दारिद्र्याचे मूळ हे शेती व्यवसायातील आहे म्हणून आपण शेती व्यवसायाचा प्रामुख्याने विचार करतो आहोत. त्यामध्ये शेती व्यवसायाचे स्वरूप, त्याच्यातील नैसर्गिक घटक आणि शासकीय धोरण यावर चर्चा होईल. शेतीमालाच्या बाजारभावासंबंधाने होणारे आर्थिक शोषण हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर आजपर्यंतच्या विकासयोजनांमध्ये जे काही वेगवेगळे प्रकल्प हाती घेण्यात आले, किंवा जी काही योजनांची बांधणी करण्यात आली त्यात शेतकऱ्यांची म्हणजे बहुजनांची फसवणूक कशी होत होती, हा विचार केला जाईल. विशेषतः जमीन वाटप, उत्पादन वाढ आणि धर्मदाय- म्हणजे शाळा, दवाखाने उघडणे- या प्रकारच्या योजना. या तीन वर्गांमध्ये वेगवेगळे प्रकल्प व योजना यांचा विचार तपशीलवार करण्यात येईल. या नंतर हा जो सगळा अर्थशास्त्रीय विचार आहे तो

शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती । १५३