पान:शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती (Shetkari Sanghataana Vichar aani Karyapaddhti).pdf/१५२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

संबंध जागतिक अर्थशास्त्राच्या इतिहासात कुठे बसतो, त्याचा काही संबंध लागतो का, याचाही थोडा अभ्यास करणे आवश्यक आहे आणि एवढा विचार झाला की आपला एखादा कार्यकर्ता अर्थशास्त्राच्या प्राध्यापकाला तोंड द्यायला तयार होईल असे आपण गृहीत धरू.
 ही चर्चा आजच्या दिवसात संपेल अशी मला आशा नाही. निरनिराळे महत्त्वाचे मुद्दे आहेत. उद्या सकाळचा निम्मा वेळ तरी यात जाणार आहे. प्रत्येक वेळी एकेक मुद्दा घेतल्यानंतर मी किंवा शेतकरी संघटनेचे दुसरे कोणीही कार्यकर्ते, ५/१० मिनिटात प्रास्ताविक करून आजपर्यंतचा यावर विचार काय आहे, हे सांगतील. त्यानंतर खुली चर्चा होईल. ज्याला ज्याला चर्चेत भाग घ्यायचा आहे, त्याने आवश्य घ्यावा. शिबिराचे स्वरूप हे शिबिराचेच राहावे; शिबिर म्हणजे १॥ दिवसाची सभा होऊ नये. एकाच माणसावर बोलायची वेळ येऊ नये; अशी अपेक्षा आहे. हे संपल्यानंतर उद्या ११/११॥ च्या सुमारास 'शेतकरी संघटना, अडचणी आणि मार्ग' या विषयी चर्चा होईल आणि त्यात प्रामुख्याने बागायदार शेतकरी मोठा-लहान शेतकरी. शेतकरी-शेतमजूर वगैरे वेगवेगळ्या लोकांचे आंदोलनाच्या दृष्टीने काय संबंध आहेत, त्यांच्यामध्ये संघर्ष कितपत आहेत- आपण त्यात शेतकरी व ग्राहक हाही संबंध घालू शकतो- याचा आपण विचार करू. या बरोबरीनेच शेतकऱ्यांची जुनी, नवी आंदोलने यांचा तात्त्विक विचाराच्या अनुषांगाने विचार करू. आजपर्यंतचा आपला अनुभव काय आहे, आंदोलनात वापरण्यासारखी कोणकोणती हत्यारं शेतकऱ्याकडे आहेत, ती वापरताना कोणती तंत्रे वापरावी लागतात, कोणती सावधगिरी बाळगावी लागते या सर्वाचाच, वेळेच्या मर्यादेत जसा होईल तसा विचार करू. आपण एकेक शेतीमालाची वस्तू घेऊन आंदोलने लढवली. जसजशी शेतकरी संघटनेची ताकद वाढत जाईल तसतसे आंदोलनाचे स्वरूपही व्यापक होत जाईल. ही भूमिका आजपर्यंत योग्य ठरली. त्याविषयीही चर्चा करू. पुढे हेच तंत्र वापरायचे आहे की वेगळी काही तंत्रे वापरायची आहेत याचाही विचार करता येईल. तेव्हा थोडक्यात या शिबिरातील चर्चा तीन भागात होईल:-
 १) अर्थशास्त्र २) संघटना ३) आंदोलन.

 हे शिबिर अभ्यासाचे शिबिर आहे. ज्यांनी कुणी येताना कागद वगैरे आणलेले नसतील त्यांनी अजूनही सांगावे. आपण काहीतरी व्यवस्था करू. कारण हा वर्ग आहे. ही जाहीर सार्वजनिक सभा नाही किंवा लोकसभाही नाही, येथे अभ्यास

शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती । १५४