पान:शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती (Shetkari Sanghataana Vichar aani Karyapaddhti).pdf/१५४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्यावरून दुधाचा उत्पादनखर्च ३.५० रु. पेक्षा निश्चित कमी नाही. कोणत्याही मालाचा उत्पादन खर्च काढणे हे सोपे काम नाही. ते एक वेगळे शास्त्र आहे आणि ज्याला शेती जमते, ज्याला दुधाचा धंदा जमतो, त्याला उत्पादन खर्च काढता येतोच असे नाही. शिवाय ज्यांना चार वेळा भागाकार करायला सांगितले तर चार वेगळी उत्तरे येतात, त्यांनी या फंदात पडू नये.
 दुधाच्या लढ्याकरीता कार्यक्रम ठरलेला आहे. २५ मे १९८१ या दिवशी महाराष्ट्रभर दूध-भाताचा लढा चालू करण्याचे ठरलेले आहे. दुधाचा तुटवडा केला जाईल, पण मागणी केली जाईल दूध आणि भात यांच्या भावांची हे का? हे दोन पदार्थ का? या वेळीच का? अभ्यास केल्यावर हे समजण्यासारखे आहे. आमच्या पुढाऱ्यांना हे समजायचे नाही. शेतकऱ्यांना फक्त समजते. आत्ता दूध उत्पादन भरपूर आहे. आत्ता दूध थांबवले तर पंजाबातली मंडळीही इथे दूध पाठवायला तयार होतील. गुजरातमधली तर पाठवतीलच. मग तुम्हाला दुधाचा लढा यशस्वी करायचा असेल तर मे आणि जुलै या महिन्यातच केला पाहिजे. मे चांगला. कारण त्यावेळी लग्नाचे मुहूर्त असतात. तेव्हा दूध थांबवल्याचे परिणाम लगेच होतील आणि उन्हाळ्यात छोट्या शेतकऱ्यांच्या घरी दूध कमी असते. त्यांच नुकसान कमी होईल. म्हणून २५ मे १९८१ हा दुधाचा मुहूर्त आहे. दुसरा कुणी आला आणि तुम्हाला पंचांग दाखवायला लागला तर त्याच्याकडे लक्ष देऊ नका. मुंबईमध्ये झाडू कामगार संप करतात तो नेहमी पावसाळ्याच्या सुरुवातीला. ७/८ जूनला झाडू कामगारांचा संप! कारण गटारे त्याच वेळी तुंबतात. त्याच वेळी त्यांचा लढा यशस्वी होऊ शकतो. त्याचप्रमाणे शेतकरी आंदोलनाची काही तत्त्वे आहेत, काही डावपेच आहेत. ज्यांनी शेतकरी आंदोलनाचा अनुभव घेतलेला नाही, त्यांनी आम्हाला सांगू नये.

 किती दिवसात यश होईल? कोणत्या कारणांनी स्थगित होऊ शकेल?

 नाशिकचे आंदोलन चालू असताना १३ तारखेला आम्ही ते २४ ते ४८ तास स्थगित केले. सगळी कारणे काय आहेत, हे जेव्हा या आंदोलनाचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हाच सांगता येतील, आत्ता ती सांगितली तर पोलिसांना कळतील. पण १२ तारखेला संध्याकाळी नाशिक जिल्ह्यात पाऊस होते. मी टीकाकारांना

शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती । १५६