पान:शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती (Shetkari Sanghataana Vichar aani Karyapaddhti).pdf/१५६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विनिमयाच्या पद्धतीमध्ये आणि पैशाच्या पद्धतीमध्ये आल्याबरोबर भांडवली विकासाच्या पद्धतीचा जो फरक पडतो आणि शोषणाची जी प्रक्रिया सुरू होते, त्यामध्ये उत्पादनखर्चावर आधारित भाव मागण्याची जी पद्धत आहे ती भांडवली विकासाच्या इकॉनॉमी पद्धतीप्रमाणे नाही काय? आणि जर आपल्याला भांडवली विकासाची ही पद्धत अभिप्रेत असेल तर आपल्या पद्धतीमध्ये याचा अंतर्भाव आवश्यक नाही का?
 शेतकरी व शेतमजूर हा वाद इंडियावाल्यांनी भारतात फूट पाडण्यासाठी काढलेला आहे हेही तर्कशुद्धतेने तपासायला हवे. शेतकरी, शेतमजूर हा कुणाचा जेन्यूइन प्रश्न असू शकतो. दुसरे असे की विजय जावंधियांनी जे म्हटले की तात्यासाहेब हा काही नैसर्गिक कारणामुळे आज श्रीमंत आहे, तर ते नैसर्गिक कारण समजून घ्यायला पाहिजे. भारतातील आजची विषमता दोन कारणांमुळे आहे. एक, जमीन तुमच्याजवळ किती आहे व दुसरे, तुमची जात कोणती आहे आणि जमीन धारणेतील विषमता व जातीतील विषमता नैसर्गिक नाही. ती मानवनिर्मित आहे. भारतातील गरिबीतील विषमता हे मानवनिर्मित धोरण आहे, तो नैसर्गिक अपघात नाही.
 तिसरी गोष्ट जी शरद पाटलांनी सांगितली की, खेड्यामधील आमदार-तात्यासाहेब - त्याची नजर खासदाराच्या खुर्च्यांवर आहे, म्हणून तो इंडियाचाच भाग आहे. मला असे वाटते की तात्यासाहेब हा भारताचा भाग आहे. त्याला आपण भारताच्या बाहेर ढकलू शकत नाही. शेतकरी आंदोलनांध्येसुद्धा तात्यासाहेब फार मोठ्या प्रमाणावर आहे व ही आनंदाची गोष्ट आहे. कारण त्यांच्या हातात शक्ती व प्रभाव आहे. त्यांनी या आंदोलनात जरूर असावे.

 बोकरे साहेबांनी कपाशीचे जे भाव काढले आहेत ते माझ्या हातात आहेत. भाव काढताना खेळत्या भांडवलावरील व्याज, स्थायी भांडवलावरील व्याज, Rental value of Land आणि १२।।% नफा आणि बाजारखर्च याबद्दल माझे काही म्हणणे नाही. पण मग हे धरताना मजुराची मजुरी ४.८८ रु. का धरली हो? ७०० रु. भाव ८ रु. मजुरी का नाही धरली? १० रु. का नाही धरली? त्यावेळी शेतकऱ्यावर होणारे सगळे अन्याय दूर करण्याचा तुम्ही प्रयत्न केला परंतु मजुरावर होणारा अन्याय दूर करण्याचा प्रयत्न केला नाही. कारण हे भाव शेतकऱ्याने काढलेले

शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती । १५८